आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या गाडीची धडक; भावंडे ठार, वडील गंभीर; लेकीला परीक्षेसाठी नेताना काळाचा घाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- परभणी येथे एमएचा पेपर देण्यासाठी औरंगाबादहून मुलगी आणि मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना गुन्हे शाखेच्या चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील बहीण, भाऊ ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील रिलायन्स पेट्राेल पंपाजवळ घडली. सूरज कुंडलिकराव देशमुख (२२) व स्वाती कुंडलिकराव देशमुख (२३, रा. मारवाडी, ता.जिंतूर, जि.परभणी)  असी मृत बहीण, भावाची नावे आहेत. तर दुचाकी चालवत असलेले सूरज, स्वातीचे वडील कुंडलिक देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत.  

सूरज व स्वाती हे दोघे बहीण-भाऊ औरंगाबाद येथे रूम करून शिक्षण घेत आहेत. दरम्यान, स्वातीचा एमएचा परभणी येथे पेपर होता. यामुळे तिचे वडील कुंडलिकराव देशमुख यांच्यासह सूरज, स्वाती हे एकाच दुचाकी (एमएच २२ एई ९५८४) ने परभणीकडे जाण्यासाठी सकाळीच निघाले होते. दरम्यान, सकाळी ६ वाजेच्या सुमारास ते जालना येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आले असता समोरून येणाऱ्या पोलिसांच्या टाटा सुमोची (एमएच २१ एल ०४२६) जोराची धडक बसल्यामुळे हे सर्वजण दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना उपचारासाठी जालना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात अाले. उपचारादरम्यान सूरज आणि स्वाती देशमुख यांचा मृत्यू झाला.

कुंडलिक देशमुख हेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लक्ष्मण देशमुख यांच्या फिर्यादीवरून चालक पोलिस हेड कॉन्स्टेबल एस. आर. कुलकर्णी यांच्यावर चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सय्यद हे करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...