आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगाव तालुक्यात चालतात सौरऊर्जेवर दोन पेट्रोलपंप, दरमहा दहा हजारांची बचत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - तालुक्यातील ग्रामीण भागात विजेच्या दहा तासांच्या भारनियमनाला पेट्रोलपंपचालकांनी नवा पर्याय शोधला असून सौरऊर्जेवर सध्या ११ तास पेट्रोलपंप चालवले जात असल्याने हा कुतूहलाचा विषय बनत चालला आहे.

ग्रामीण भागात तर दहा तासांचे सक्तीचे भारनियमन, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा या कारणांमुळे शेतक-यांसह उद्योजक हैराण झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका पेट्रोलपंपचालकांना बसला आहे. भारनियमनामुळे वैतागलेल्या पेट्रोलपंपचालकांनी पंपावर जनरेटर आणले, परंतु दररोज यासाठी इंधनावर पाचशे रुपये रोज खर्च करण्याची वेळ त्यांच्यावर आली. जनरेटर बंद करणे, सुरू करणे, त्याचे तांत्रिक बिघाड या त्रासाला त्यांना सामाेरे जावे लागत आहे. जनरेटरच्या कमी दाबाने ग्राहकांना पेट्रोल कमी मिळत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. यावर उपाय म्हणून इंडियन ऑइल या पेट्रोलियम कंपनीने पंपासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करत सौरऊर्जा पॅनल बसवले. माजलगाव शहरालगतचा करवा पेट्रोलपंप व पात्रुड येथील मुंडे पेट्रोलियम या दोन्ही पेट्रोलपंपांवर सौरऊर्जा पॅनल बसवण्यात आलेले आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सौरऊर्जेचे पॅनल सुरू करण्यात येते. या पेट्रोलपंपावर दोन मशिन्स, पथदिवे, ऑफिसमधील संगणक, फॅन अशी उपकरणे २० तास चालू लागली आहेत. यापूर्वी विजेवर पेट्रोलपंपांना महिन्याकाठी जवळपास दहा हजार रुपये वीज बिल येत होते. जनरेटरसाठी पंधरा हजार रुपये खर्च येत होता. आता तो खर्च कमी झालेला आहे.
खर्चाची बचत झाली
सहा महिन्यांपूर्वी विजेच्या अडचणीला कंटाळून आम्ही जनरेटरचा वापर सुरू केला, परंतु जनरेटरवरही खर्च होऊ लागला. या खर्चाला फाटा देण्यासाठी सौरऊर्जा पॅनल बसवून तीन केव्ही सोलर पॅनल, सहा केव्ही इन्व्हर्टर बसवले आहे. यावर २० तास पेट्रोलपंप चालत आहे. त्यामुळे विजेचा प्रश्न मिटला आहे. वेळ व खर्चाची बचत होऊ लागली आहे
डॉ. अरुण मुंडे, संचालक, मुंडे पेट्रोलियम