परभणी- जबाबावरून गुन्हा दाखल करण्याची भीती घालून एकाला २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सेलू पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस हवालदारांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने बुधवारी (दि. १९) सेलू येथील पालिकेसमोरील रस्त्यावर रंगेहाथ पकडले.
सेलू येथील एका महिलेने विष प्राशन केले होते. तिच्यावर उपचारादरम्यान सेलू पोलिस ठाण्याचा हवालदार संजय सखाराम जाधव याने त्या महिलेचा जबाब नोंदवला. तिने दिलेल्या जबाबानुसार कोणतीही कार्यवाही करणार नसल्याचे तसेच जबाबातील माहिती देऊन पैसे न दिल्यास या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची भीती हवालदार जाधव व हवालदार अविनाश केरबा बनाटे या दोघांनी त्या महिलेच्या दिरास दाखवली. यात कोणतीही कारवाई न करण्यासाठी २५ हजाराच्या लाचेची मागणी केली. दिराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे बुधवारी या दोघांविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून पथकाने सेलू पालिकेच्या समोरील रस्त्यावर सापळा रचला. त्या वेळी पाच हजार रुपयांची रक्कम हवालदार जाधव याने स्वीकारली. त्याच वेळी पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले.