आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूरच्या सुस्त आरोग्य यंत्रणेलाच स्वाइन फ्लू!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर जिल्ह्यात वेगाने पसरत चाललेल्या स्वाइन फ्लूमुळे दोघांचा बळी गेला आहे. त्याला सरकारी अनास्था आणि प्रशासकीय दिरंगाई कारणीभूत आहे. आरोग्य उपसंचालक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, सिव्हिल सर्जन, महापालिकेचे आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी असे एकापेक्षा एक मोठे अधिकारी असूनही प्रशासनात एकवाक्यता आणि सुसूत्रता आढळली नाही. त्यामुळे लातूरच्या आरोग्य यंत्रणेलाच जणू स्वाइन फ्लू झाल्याचा प्रत्यय येतो आहे.

दहा दिवसांपूर्वी लातूरच्या विवेकानंद रुग्णालयात स्वाइन फ्लूची लक्षणे असलेली महिला दाखल झाली. तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, अशा रुग्णांच्या घशातील स्राव घेऊन तो पुण्याला तपासणीसाठी पाठवला जातो, त्यातून स्वाइन फ्लूचे निदान होते. केवळ शंभर रुपयांचे ते मेडिया किट केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध होते. मात्र, दिवसभर मागणी करूनही व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवा, मगच किट मिळेल, अशी हेकेखोर भूमिका वैद्यकीय महाविद्यालयाने घेतली.

खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी मेडिया किट देण्याचा नियम नसल्याचे सांगण्यात आले. माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारल्यानंतर महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी ते किट दिले आणि स्वॅब तपासणीसाठी जाऊ शकला. विशेष म्हणजे या महिलेला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाल्यानंतरही आरोग्य यंत्रणा हलली नाही. प्रत्येक वरिष्ठ अधिकारी इतरांकडे बोट दाखवून "माझी नाही, त्याची जबाबदारी आहे' असे सांगण्यात धन्यता मानत आहेत. मनपाने स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्यानंतर तातडीने जनजागृती मोहीम हाती घ्यायला हवी होती. त्यासाठी राज्याच्या आरोग्य संचालकांकडून आदेश येण्याची वाट पाहण्यात आठ दिवस घालवण्यात आले. औशातील प्रा. मुलूकसाब अकबर अली यांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यांना स्वाइन फ्लूच असल्याचे निदान झाले. मात्र, यंत्रणेने ही माहिती सांगण्यापेक्षा दडवली.

गेल्या वेळी स्वाइन फ्लूची साथ पसरल्यानंतर लातूर विभागात पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर ८३ जणांना लागण झाली होती. त्यामध्ये माजी खासदार अरविंद कांबळे यांचा समावेश होता. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सर्व आरोग्य यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन त्यांना कामाला लावले होते. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन त्यांना मुलांची काळजी घेण्याविषयीच्या सूचना दिल्या होत्या.

मुख्याध्यापकांची बैठक
महापालिकेनेमंगळवारी रात्री शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली. शाळेतील स‌र्व मुलांची काटेकोर तपासणी करून त्यातील सर्दी-ताप असलेल्यांना घरीच किमान सात दिवस विश्रांती घ्यायला सांगावे. एका मुलाची सर्दी दुसऱ्याला होऊ नये यासाठी शक्यतो आजारी मुलांना शाळेत येण्याची सक्ती करू नये, याबाबत त्यांच्या पालकांनाही कळवावे. तसेच या अनुपस्थितीबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्रांची मागणी करू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे महापालिकेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे.

मैं बडा की तू बडा
लातूरमध्येशासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. तेथील अधिष्ठाता पद हे वरिष्ठ वर्ग एक दर्जाचे आहे. तसेच आरोग्य उपसंचालक पद असून तेही वरिष्ठ वर्ग एकचे पद आहे. मात्र, महाविद्यालय उच्च शिक्षण खात्याअंतर्गत तर उपसंचालक, सिव्हिल सर्जन आरोग्य खात्याच्या अंतर्गत काम करतात. त्यामुळे यांच्यात कोण मोठा अधिकारी, कुणी कुणाला सूचना द्यायच्या याबाबत मतभेद आहेत. दुसरीकडे महापालिकेचे आरोग्य अधिकारी पदही वरिष्ठ दर्जाचे आहे. मात्र तेथे पूर्वीच्या नगरपालिकेचेच बीएएमएस असलेले अधिकारी काम करीत आहेत.