आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये आणखी दोघे स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - पुण्याहून जिल्ह्यात आलेल्या स्वाइन फ्लूने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. एक युवक स्वाइन फ्लू बाधित असताना आणखी दोघांना स्वाइन फ्लू झाल्याचे पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, स्वाइन बाधित रुग्णांची नावे गाेपनीय ठेवण्याचा निर्णय जिल्हा रुग्णालयाने घेतला आहे.
स्वाइन फ्लूने बाधित व संशयित रुग्णांमुळे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. तीन जण बाधित, तर १५ जण संशयित आढळले होते. पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. वडवणी तालुक्यातील देवडीतील युवकाला पाच आॅगस्ट राेजी स्वाइन फ्लूच्या संशयावरून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वॅब तपासणीनंतर त्याला स्वाइन फ्लू झाल्याचे समोर आले होते. यानंतर चार जणांना स्वाइनच्या संशयावरून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले हाेते. चारपैकी दोघांना स्वाइन फ्लू झाल्याचे अहवालातून निष्पन्न झाले आहे. यामुळे बाधितांची संख्या तीनवर पाेहोचली असून स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून येताच उपचार घ्यावेत.
आरोग्यासाठी काळजी घ्या
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. Á जेवणात पौष्टिक आहार घ्या. Á लिंबू, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. Á पुरेशी झोप घ्या, भरपूर पाणी प्या. Á साबणाने वारंवार हात धुवा. Á घराबाहेर पडताना नाक, तोंड झाकून घ्या. Á लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्या.

मास्कसाठी जिल्ह्यात चाचपणी
स्वाइन फ्लूपासून बचावासाठी एन -९५ किंवा अॅम्बेसेडर मास्क वापरण्यात येतात. रुग्ण, उपचार करणारे डॉक्टर व कक्षात कार्यरत कर्मचाऱ्यांना हे मास्क वापरणे अत्यावश्यक असते. गतवेळी स्वाइनच्या साथीत अचानक मास्क कमी पडल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातून दोनशे मास्क उसनवारीवर घेण्यात आले होते. सध्या जिल्हा रुग्णालयाकडे दीडशे मास्क उपलब्ध अाहेत; पण मास्कचा तुटवडा जाणवू नये यासाठी शेजारील जिल्ह्यांकडून मास्क मागवण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

आयसोलेटेड वाॅर्ड
स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विशेष कक्षात तज्ज्ञ बाधित रुग्णांवर उपचार करत असून एकाला सुटी देण्यात आली आहे. सध्या चार रुग्णांवर या कक्षात उपचार सुरू असून. सहा खाटांच्या क्षमतेचा आयसोलेटेड वाॅर्ड तयार करण्यात आला आहे.

घाबरू नका, सल्ला घ्या
जिल्ह्यात स्वाइनचे तीन रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरू नये. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करा. शंका असल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधा.
डॉ. एन. एस. चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.