आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Udgir Rural Police Station,Latest News In Divya Marathi

लाच घेणारा पोलिस गजाआड; विवाहितेच्या छळाचे प्रकरण मिटवण्यासाठी 75 हजार घेतले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोविंद राठोड यांना 75 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी रंगेहाथ पकडले. राठोड यांना अटक करण्यात आली आहे. विवाहितेच्या छळाचे प्रकरण न्यायालयाबाहेर मिटवले म्हणून दीड लाखाची लाच मागणे राठोड यांच्या अंगलट आले. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात एका विवाहितेने सासरी छळ होत असल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार 498चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु सदर विवाहितेच्या सासरकडील मंडळींनी हे प्रकरण न्यायालयाबाहेरच तडजोडीतून कायमस्वरूपी मिटवण्यासाठी पोलिसांना साकडे घातले. त्यासाठी पोलिस निरीक्षक गोविंद राठोड यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या मंडळींना एकत्र बसवून मार्ग काढण्यात आला. बैठकीत ठरल्यानुसार सदर विवाहितेला 10 लाख रुपये देण्याचे ठरले. ती रक्कमही तत्काळ देण्यात आली आणि हे प्रकरण निकाली काढण्यात आले. सासरच्या मंडळींनी तत्काळ 10 लाख मोजल्याने सदर पार्टी ‘मालदार’ असल्याची जाणीव राठोड यांना झाली. त्यामुळे आपणही प्रकरण मिटवल्याचा मोबदला का घेऊ नये म्हणून सासरच्या मंडळीकडील प्रमुखांकडे तगादा सुरू केला. पोलिसांचा सतत तगादा सुरू झाल्याने या प्रकरणातील मुलाच्या आजोबांनी राठोड यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी समेट घडवून आणल्याबद्दल दीड लाखांची मागणी केली. त्यानंतर त्यांना 50 हजार देण्यात आले; पण उर्वरित पैशांसाठी राठोड यांनी त्यांना पुन्हा तगादा लावला. त्यामुळे आणखी 75 हजार देण्याचे ठरले. ही रक्कम ठाण्यातच घेताना पोलिस उपअधीक्षक एन. जी. अंकुशकर यांच्या पथकाने राठोड यांना रंगेहाथ पकडले.
झाडाझडती सुरू
एकीकडे गोविंद राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दुसर्‍या बाजूला राठोड यांच्या लातुरातील घरावर एसीबीचे पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांनी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास छापा मारला. रात्री उशिरापर्यंत ही झाडाझडती सुरू होती. अवैध मार्गाने जमवलेली बेहिशेबी मालमत्ता सापडते का, याचा शोध घेतला जात आहे.

निलंबनाचा प्रस्ताव
गोविंद राठोड हे लाच घेताना सापडल्याने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार केला जात आहे. या संदर्भातील पोलिस उपअधीक्षकांचा अहवाल आल्यानंतर तो विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर निलंबन केले जाईल. बी. जी. गायकर, पोलिस अधीक्षक, लातूर