आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेत सहभाग म्हणजे सरकारजमा झालो नाही - उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - शिवसेना सत्तेत सहभागी झाली म्हणजे सरकारजमा झाली नाही. जे जे आम्हाला पटते त्या वेळी सरकारसोबत राहू अन् जे पटणार नाही त्याप्रसंगी सरकारच्या विरोधात उभे राहू ही शिवसेनेची भूमिका आहे, अशा रोखठोक शब्दांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे शनिवारी आयोजित पाणी परिषदेत ते बोलत होते.
आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आयोजित केलेल्या पाणी परिषदेला पालकमंत्री दिवाकर रावते, जिल्हाधिकारी धीरजकुमार, मनपा आयुक्त सुशील खोडवेकर, जलतज्ज्ञ या. रा. जाधव, खासदार संजय जाधव, आमदार हेमंत पाटील, नागेश पाटील आष्टीकर, सुभाष साबणे आदी उपस्थित होते.

माळाकोळी येथील पाणी परिषद लौकिकार्थाने शिवसेनेचा मेळावाच झाला. या परिषदेत या. रा. जाधव वगळता एकही जलतज्ज्ञ उपस्थित नव्हता. त्यांचेही अर्ध्याहून अधिक भाषण उद्धव ठाकरे येण्यापूर्वीच झाले. आयोजक प्रताप पाटील, पालकमंत्री दिवाकर रावते पाणी या विषयावर फारसे बोललेच नाहीत. उद्धव ठाकरे यांनीही १५ मिनिटांच्या भाषणात सुरुवातीला नांदेड जिल्हा भगवामय करण्याचेच आवाहन केले. सिंचन प्रश्नाकडे वळताना त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडण्याचेच काम केले. यापूर्वीही सिंचनाचे प्रकल्प झाले नाहीत असे नाही, परंतु केवळ नारळ वाढवले गेले. पैसा येतो, कोण पचवतो काही पत्ताच लागत नाही. पंधरा वर्षांत राज्याची जी अवस्था काँग्रेस, राष्ट्रवादीने केली ती थांबवण्यासाठी आणि आज जी परिस्थिती बिघडली ती सुधारण्यासाठी शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.

पाणी परिषद कोरडी राहता कामा नये - पाणीप्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनाही मोलाचा सल्ला दिला. ही पाणी परिषद कोरडी राहता कामा नये. प्रकल्प कसे लवकर पूर्ण होतील, लोकांच्या घरात पाणी लवकर कसे पोहोचेल याकडे लक्ष ठेवा. आपत्तीग्रस्तांना मदतीच्या मागण्या करीत बसण्यापेक्षा शासनाकडून आलेली कोट्यवधींची रक्कम सातबारा नाही, बँकेत खाते नाही म्हणून परत जाणार नाही याकडे जातीने लक्ष द्या. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांत पाणी परिषद घ्या, असे आदेशही त्यांनी दिले.
पाणी राष्ट्रीय संपत्ती जाहीर करा

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पाण्याची सध्याची परिस्थिती पाहता पाणी राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर पाणी परिषदेच्या शेवटी प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाणी राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्याचा ठराव मांडला व तो एकमताने संमत झाल्याचे जाहीर केले. परिषदेला जवळपास ६-७ हजार नागरिक व शेतकरी उपस्थित होते.
या. रा. जाधवांनी टोचले कान

जलतज्ज्ञ या. रा. जाधव यांनी आपल्या भाषणात पाण्याबाबत मराठवाड्यावर होणारा अन्याय आकडेवारीसह मांडला. कृष्णा खोऱ्यातील हक्काचे २१ टीएमसी पाणी, जायकवाडीचे हक्काचे पाणी यावर जाधव यांनी सखोल विचार मांडले. जलसिंचनाच्या अभियानात जनतेचा सहभाग वाढवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना या. रा. जाधवांकडून दोन ग्रंथांची भेट
माळाकोळी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी आले असताना जलतज्ज्ञ या.रा. जाधव यांनी त्यांना महाराष्ट्र जलसंपत्ती आणि विकासाचा प्रादेशिक असमतोल व केळकर समिती अहवाल स्वरूप, समीक्षा ही दोन पुस्तके भेट दिली. या दोन्ही पुस्तकात या.रा.जाधव यांनी मराठवाड्यावर सिंचनाच्या बाबतीत होणारा अन्याय आकडेवारीसह सप्रमाण मांडला आहे. तसेच केळकर समितीने त्यांना ज्या कामासाठी नियुक्त केले ते काम केलेच नाही. आणि उपाययोजना सुचवताना मराठवाड्यावर कसा अन्याय केला याचीही मांडणी केली.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ही दोन्ही पुस्तके जाधवसाहेब आपण दिली आणि मी ती न वाचताच रद्दीत टाकली तर काय फायदा असा प्रश्न करून ती वाचण्याचे जाहीर आश्वासन दिले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या सत्तेत सहभागी असल्याने त्यांना या पुस्तकातून मराठवाड्यावर झालेल्या अन्यायाचे वास्तव कळेल व त्यावर ते काही उपाययोजना करतील, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.