आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरगा तालुक्याचे माजी आमदार भास्कर चालुक्य यांचे निधन, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा : उमरगा तालुक्याचे माजी आमदार भास्करराव (अण्णासाहेब) शिवरामपंत चालुक्य यांचे वयाच्या ९०व्या वर्षी बुधवारी (दि.७) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास उमरगा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी दाबका येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मंडळी उपस्थिती होती.
सर्वसामान्यांत मिळून मिसळून असणारे, मितभाषी, गरिबांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे असे मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून भास्करराव चालुक्य यांची ओळख होती. भास्करराव यांनी १९६७, १९७२ आणि १९७८ असे सलग तीन वेळा उमरगा तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. समिती, उपविधान समिती व अंदाज समितीचे सदस्य, एप्रिल १९७८ मध्ये उपविधान समितीचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे ते विश्वासू सहकारी होते. १९५५ ते १९६९ या काळात ते भारत शिक्षण संस्था व श्री शिवाजी महाविद्यालयाचे सहसचिव होते. १९६० ते १९६५ या कालावधीत त्यांनी उस्मानाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषवले.
१९६४ ते १९७० पर्यंत ते को-आॅपरेटिव्ह जनरल इन्शुरन्स सोसायटीच्या(मुंबई) संचालक मंडळाचे सदस्य होते. लातूर येथील जवाहर सूतगिरणीचे अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेचे डायरेक्टर, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे सभासद, उमरगा तालुका काँगेस कमिटीचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य, उस्मानाबाद जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य, उमरगा पंचायत समितीचे पहिले सभापती, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केले होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि.७) दुपारी ३ वाजता त्यांच्या दाबका येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवाजीराव चालुक्य, खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार बसवराज पाटील आदी हजर होते. दरम्यान, त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बातम्या आणखी आहेत...