आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मलई’साठी दुधात भेसळ, पिशवीतील दुधाबाबतही शंका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - दूधवाल्यामार्फत किंवा पिशवीद्वारे घरी येणारे दूध किती शुद्ध आहे, याचा अंदाज आपण लावू शकत नाही. मात्र, एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार देशात 68.44 टक्के दूध भेसळयुक्त असून त्यापैकी 31 टक्के भेसळ ग्रामीण भागात आढळून आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षभरामध्ये 10 पैकी 4 नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हे दूध संकलन केंद्रातील आहे.


संकलन केंद्रात एकत्रित होणा-या दुधामध्ये भेसळ असल्याचे उघडकीस आल्याने पिशवीतील दुधाबाबतही शंका उपस्थित होत आहे. भेसळ रोखण्यासाठी असलेली यंत्रणा अपुरी असून दुधाची तपासणी वेळोवेळी होत नाही. त्यामुळे भेसळीच्या माध्यमातून आरोग्याशी खेळ बिनदिक्तपणे सुरू आहे. मंगळवारी राजधानी मुंबईत दुधामध्ये भेसळ करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही अशा टोळ्या सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 4 नमुने अप्रमाणित आढळून आले असून त्यापैकी दोन प्रकरणांत खटले सुरू आहेत.


उर्वरित दोन प्रकरणांत दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे अप्रमाणित आढळून आलेले हे नमुने केवळ संकलन केंद्रातील आहेत. या प्रकारामुळे जिल्ह्यातही दुधात
भेसळ मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.


दूध पावडरचा वापर
गेल्या वर्षी अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ पथकाने बाभळगाव येथे छापा टाकून बनावट दूध पावडर तयार करणा-या कारखान्याचा पर्दाफाश केला होता. या पावडरचा दुधामध्ये वापर करण्यात ेयेत असावा, असा प्रशासनाला संशय होता. विशेष म्हणजे या कारखान्यातून दररोज लाखो लिटर दूध टँकरद्वारे बाहेर पडत होते.


दोन लाखांचा दंड
जिल्ह्यात 42 दूध संकलन केंद्रे आहेत. तुळजाभवानी, नॅचरल आणि विजेंद्र देवानंद कंची हे 3 दूध पॅकिंग सेंटर आहेत. अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या नमुन्यांपैकी अप्रमाणित आढळलेल्या त्रिमूर्ती मिल्क सेंटरला (उस्मानाबाद) 1 लाख 10 हजार रुपये, विजेंद्र देवानंद कंची शीतकरण कें द्राला (ता. तुळजापूर) 95 हजार रुपये, वारणा शीतकरण केंद्राला 20 हजार, असा एकूण सव्वादोन लाखांचा दंड ठोठावला. स्क्रायबर डायनामिक दूध शीतकरण केंद्राविरुद्ध (मातोळा, ता. उमरगा) दोन खटले दाखल करण्यात आले आहेत.


याची होते भेसळ
डिटर्जंट पावडर : दुधामध्ये डिटर्जंट किंवा वॉशिंग मशीनच्या पावडरचा वापर फॅट किंवा टिकाऊपणा वाढवण्यासाठी केला जातो. त्याचा पोटावर वाईट परिणाम होतो.
साखर : अधिक पाण्याचा वापर केल्यानंतर लॅक्टोमीटरवर नोंद कमी होऊ नये यासाठी अनेकदा दुधामध्ये साखरेचा वापर केला जातो. साखरेमुळे दुष्परिणाम होत नसले तरी पाणी दूषित असल्यास गंभीर आजार होऊ शकतो.
धान्य पावडर : फॅटची मात्रा वाढवण्यासाठी तसेच भेसळ लपवण्यासाठी साबूदाणा, तांदूळ, गहू आणि मक्याच्या पिठाचा वापर केला जातो. त्यामुळे दुधाचा न्यूट्रिशन दर्जा कमी होतो.
युरिया : सिंथेटिक दुधामध्ये फॅट वाढवण्यासाठी युरियाचा वापर केला जातो. त्यामुळे इंटेस्टाइनल
ट्रॅक्ट आणि डायजेस्टिव्ह सिस्टिम खराब होते.
याशिवाय मीठ, फॉरमलिन, हायड्रोजन परऑक्साइड, बोन डस्ट, हायड्रोजिनेट ऑइल, अ‍ॅनिमल फॅट्सचाही वापर केला जातो.

शहरात प्रमाण जास्त
फूड सेफ्टी स्टँडर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार देशात विकल्या जाणा-या दुधामध्ये सुमारे 68.44 टक्के दूध भेसळयुक्त असून त्यामध्ये ग्रामीण भागाचे प्रमाण 31 टक्के आहे. शहरी भागात 69 टक्के नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. या तपासण्या सरकारी प्रयोगशाळेत करण्यात आल्या होत्या. अत्यंत घातक रसायन असलेल्या डिटर्जंट पावडरसारख्या वापरामुळे ग्राहकांसाबत जीवघेणा प्रयोग केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.


शुद्धता तपासली जाते
गेल्या वर्षामध्ये प्रशासनाने घेतलेले 10 पैकी 4 नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. या 6 महिन्यांत एकही नमुना अप्रमाणित आढळलेला नाही. दर महा 2 नमुन्यांचे उद्दिष्ट ठेवून दुधाची शुद्धता तपासली जाते.
अशोक पारधी, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद.