आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Home Minister Sushilkumar Shinde Comment On Naxlist At Latur

नक्षलवाद म्हणजे दहशतवादच; गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- अलीकडे देशात नक्षली हल्ले वाढले असून हा नक्षलवाद नसून दहशतवादच आहे. त्यामुळे त्याचा कठोरपणे मुकाबला केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. चाकूर येथे सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या विविध इमारतींच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, कालपर्यंत नक्षली चळवळीला वेगळ्या नजरेने पाहिले जात होते, परंतु छत्तीसगडमध्ये नक्षल्यांनी क्रौर्याची सीमा ओलांडत घृणास्पद हल्ला केला. ही कृती देशाला हादरवून सोडणारी आहे. काँग्रेस नेते महेंद्र कर्मा यांच्यावर 72 गोळ्या झाडून 74 वार करण्यात आले. शिवाय 30 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही कृती दहशतवादीच आहे. पर्यायाने तपास राष्टÑीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. सैन्य दलातील जवानांप्रमाणेच सीमा सुरक्षा दलातील जवानांनाही सवलती देण्यात येणार आहेत, हे स्पष्ट करत त्यांनी रेशन, प्रवासात स्वतंत्र रेल्वे डबा, सेवानिवृत्तीचे लाभ आदी सुविधा देण्याची ग्वाही दिली. तत्पूर्वी, प्रशिक्षण केंद्राच्या तीन इमारती व एका गेटला शहीद जवानांची नावे देऊन त्याचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. पंजाबचे राज्यपाल शिवराज चाकूरकर यांनी राज्य पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रे देऊन प्रशिक्षणातून त्यांचा बौद्धिक विकास घडवण्याची अपेक्षा या वेळी व्यक्त केली. यावेळी सीमा सुरक्षा दलाचे महानिदेशक सुभाष जोशी, विशेष महानिरीक्षक राजदीप सिंग, उपमहानिरीक्षक ए. के. मंदराल आदी उपस्थित होते.

5 जूनला मुख्यमंत्र्यांची बैठक
नक्षल्यांना शोधून काढत नक्षलवाद संपवण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओरिसा, महाराष्टÑ आदी नक्षल प्रभावी राज्यांत कडक धोरण अवलंबून कारवाई सुरू करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 5 जून रोजी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर नक्षल प्रभावी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची विशेष बैठक घेण्यात येऊन रणनीती ठरवण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

राज्यात परतणार नाही; निवडणूकही लढवणार नाही
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, 2014 च्या निवडणुकीनंतर आपण राज्यात परतणार नाही. तसेच आपण पुढील निवडणूक लढवणार नसल्याचा पुनरुच्चरही त्यांनी केला.