आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत पावसाचे सायंकाळचेच वेळापत्रक, सहाव्या दिवशीही मुसळधार, पिकांचे मोठे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - मागील सहा दिवसांपासून दररोज सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचे जणू वेळापत्रक झाले आहे. गुरुवारी (दि. १६) सहाव्या दिवशीही सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली.

अवकाळी वारे-वावधान व पावसाने या वर्षी रेकॉर्डच केले आहे. उन्हाचा पारा वाढत असताना मागील आठवडाभरापासून पूर्णपणे पावसाळी वातावरण झाले आहे. बुधवारी परभणीसह जिंतुरात झालेल्या मुसळधार पावसाने तर विक्रमच केला. जिंतुरात गारांचा पाऊस झाला. मंगळवारी पावसाने खंड दिला होता. त्यानंतर दोन दिवस सायंकाळच्या वेळी हजेरी लावली. दिवसा मात्र पूर्णपणे उघडीप होती. मात्र, तापमानाचा पाराही गेल्या सहा दिवसांत वाढलेला नाही.

या पावसाने फळबागांसह ज्वारी, गहू पिकांचे मोठे नुकसान केले. या वर्षी खरिपात वेळी अवेळी झालेल्या पावसाने पिकांच्या उत्पादनांत
मोठी घट झाल्याने कोरडा दुष्काळ झाला. पाणी नसल्याने रब्बीच्या पेरण्या अत्यंत कमी क्षेत्रावर झाल्या. त्यातही झालेले पीक हाताशी असताना या अवकाळी पावसाने त्याच्यावरही पाणी फेरले. गुरुवारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली.

नांदेडसह जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाची हजेरी सुरूच
नांदेड | शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत गुरुवारीही दमदार पावसाने हजेरी लावली. गुुरुवारी शहरात ३ मिमी पावसाची नोंद करण्यात आल्याचे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. शहरात सायंकाळी ४ वाजताच्या सुमाराला दमदार पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास पावसाने हजेरी लावली. शहरासह किनवट, हदगाव, माहूर, मुदखेड, हिमायतनगर, भोकर या तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. सर्वच तालुक्यांत दमदार पाऊस झाला. भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. दुपारी माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रचारसभा होती; परंतु नेमका त्याच वेळी दमदार पाऊस आल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. त्यामुळे सभा विलंबाने सुरू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अपवाद वगळता ८ एप्रिलपासून जिल्ह्यात दररोज पाऊस सुरू आहे.