आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी: बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात मजुरासह जनावरे दगावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- जिल्ह्यातील आष्टीसह, वडवणी, शिरूर व पाटोदा या दुष्काळी तालुक्यांत बुधवारी दुपारी अडीच वाजता वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने झोडपले. आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यात वीज कोसळून बैलासह सात शेळ्या दगावल्या. आष्टी शहर व तालुक्यात दुपारी अडीच वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील चिखली हनुमंतगाव, शेरी बु. आणि बेलगाव या गावांच्या परिसरात वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा जोर वाढल्याने
जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चिखली येथील रत्नाकर चंद्रभान शिंदे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधलेला बैल वीज पडल्याने दगावला, तर शेजारी असलेला दुसरा बैल आणि दोन म्हशी सुदैवाने बचावल्या. शेरी बु.येथील जाधव वस्तीवरील बाळासाहेब जाधव यांच्या मालकीच्या ७ शेळ्या वीज पडल्याने दगावल्या आहेत. बेलगाव येथील आष्टी ते डोईठाणकडे जाणाऱ्या ११ के. व्ही. वीजवाहिनीचे ५ खांब वादळी
वाऱ्यामुळे कोलमडले आहेत. यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज पडून दगावलेल्या जनावरांना शासन निर्णयाप्रमाणे तत्काळ आर्थिक साहाय्य देण्यात येईल, अशी
माहिती तहसीलदार राजीव शिंदे यांनी दिली. वडवणी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने आठवडी बाजारात व्यापाऱ्यांची धावपळ झाली,
बाजारकरूंचे हाल झाले.
रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प : धारूर येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीन वाजता पांगरी शिवारातील धारुर-अंबाजोगाई मार्गावर बाभळीचे झाड उन्मळून पडले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. पांगरी गावातील शेतकऱ्यांच्या मदतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अिधकाऱ्यांनी यंत्राच्या साहाय्याने झाड तोडून बाजूला केले. तब्बल एक तास या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी, रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा तालुक्यात हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावला.
नांदेड जिल्ह्यातही अवकाळी पावसाची हजेरी
नांदेड- जिल्ह्यात बुधवारी सायंकाळनंतर तेलंगणा, कर्नाटकच्या सीमावर्ती भागात पावसाने हजेरी लावली. धर्माबाद येथे सायंकाळी सात वाजेनंतर दमदार पावसाला सुरुवात झाली. या आठवड्यात झालेला हा तिसरा पाऊस आहे. देगलूर येथेही सायंकाळनंतर हलका पाऊस सुरू झाला. शहरात दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. तथापि, दिवसभर पावसाने हजेरी लावली नाही. दिवसभर उकाड्याने मात्र नागरिक हैराण झाले.

कळंब तालुक्यात वीज पडून शेतमजुराचा मृत्यू, भाजल्याने दोन मुली गंभीर जखमी
उस्मानाबाद- जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एन्ट्री केली असून, बुधवारी दिवसभर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात जोराच्या वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. मेघगर्जनेसह कोसळलेल्या विजांनी शेतमजुरासह तीन गायी बैल तसेच १४ शेळ्या दगावल्या, तर दाेन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर लातूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कळंब तालुक्यातील काही भागात, भूम तालु्क्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे सुटले होते. कळंब तालुक्यातील शिराढोण शिवारात शेतात शेळ्या राखत असताना रामभाऊ संभाजी शिरसट(४८, रा.कोथळा) यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये ते जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत शेळ्या राखणाऱ्या अंबिका लहू ठोंबरे (१३) आणि अंकिता अनिल गायकवाड(९, दोघी रा.कोथळा, ता.कळंब) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दुर्घटेनत १४ शेळ्या ठार झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तसेच महसूल प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
कळंबच्या तहसीलदार वैशाली पाटील, नायब तहसीलदार सुनील कावरके, मंडळ अधिकारी बी.व्ही. आडसूळ आदींनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच जखमींना शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दरम्यान, जखमी मुलींना पुढील उपचारासाठी लातूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेची शिराढोण पोलिसांत नोंद झाली आहे.