आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unseasonal Rain Damages Cash Crops In Marathwada

अवकाळीच्या तडाख्याने ज्वारी आडवी; द्राक्ष, डाळिंबासह आंबा संकटात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर/औरंगाबाद - अवर्षण व गारपिटीने गांजलेल्या शेतकऱ्यांवर अजूनही संकटांची मालिका सुरूच आहे. नव्या वर्षाचा पहिला दिवसही अवकाळी पावसाच्या तडाख्यानेच उगवला. उस्मानाबाद, जालना, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. नांदेडमध्येही रिमझिम झाली. वाशी तालुक्यात गारपिटीने ज्वारीचे मोठे नुकसान झाले. द्राक्षबागांसाठी हा पाऊस हानिकारक ठरला असून ढगाळ वातावरण राहत असल्याने गहू-हरभऱ्यावरही रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे.

१२ डिसेंबरपासून लातूर जिल्ह्यातील वातावरणात सतत चढ-उतार होत असून याचा विपरीत परिणाम अनेक पिकांवर होत आहे. गारठा व मध्यावधीत झालेल्या हलक्या पावसाने द्राक्षबागांवर भुरी व डाउनीचा प्रादुर्भाव झाला होता. त्याची तीव्रता कमी असतानाच उपाययोजना केल्याने बागा रोगाला बळी पडल्या नाहीत. सध्या ८०० एकरवर द्राक्षबागा विस्तारल्या असून त्याचे संगोपन योग्य झाल्याने फळेही चांगली लगडली आहेत. बऱ्याच बागांना पाणी कमी पडत असल्याने शेतकरी टँकर्सनी पाणी आणून त्या जगवत आहेत. गुरुवारी पहाटे झालेल्या पावसाने द्राक्षघडांनी पाणी शिरले असून त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार असल्याने द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत.

या वर्षी प्रतिकूल परिस्थिती असतानाही द्राक्षबागा जगवल्या. ढगाळ वातावरणामुळे हंगाम हातचा जातो की काय, अशी भीती वाटत असल्याचे द्राक्ष बागायतदार तुकाराम येलाले यांनी सांगितले. िनर्यातक्षम फळांच्या गुणवत्तेबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. पाच ते सहा दिवस ढगाळ वातावरण राहिले, तर द्राक्षोत्पादनात २५ ते ३० % घट येईल, असेही ते म्हणाले. डाळिंबावर तेल्याच्या प्रादुर्भावाची शक्यता असून फुलगळ होणार आहे. गव्हाच्या वाढीला व हरभऱ्यालाही हा पाऊस लाभदायक आहे. तथापि, ढगाळ वातावरण राहिले, तर गव्हावर तांबेरा, ज्वारीवर चिकटा, तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या, तर हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी मोहन भिसे यांनी सांिगतले.

नांदेड शहरात १५.७५ मि.मी.
उत्तररात्री ३ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत रिमझिम सुरू होती. शहरात एकूण १५.७५ मि.मी. नोंद झाल्याची माहिती गुरुवारी एमजीएम खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. जिल्ह्यात बुधवारी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले. त्यानंतर गुरुवारी पहाटे दमदार पावसाने हजेरी लावली.

चिंचोली लिंबाजीत गहू, अद्रकचे नुकसान
कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे पावसाने गहू, मका, कांदा व अद्रकचे नुकसान झाले. सोयगाव तालुक्यातील फर्दापूरच्या आठवडी बाजारात सर्वत्र चिखल झाला तसेच भाजीपाल्याचे नुकसान झाले.

उस्मानाबादेत सर्वदूर
उस्मानाबादसह तुळजापूर, कळंब, वाशी, भूम, परंडा, उमरगा आणि लोहारा तालुक्यांत अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तुळजापूर, परंडा, वाशी तालुक्यांत सर्वाधिक पाऊस झाला.

हिंगोलीत जोरदार
बुधवारी रात्री ११ नंतर शहरासह जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. पहाटे ३ वाजेपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस कोसळत होता. गुरुवारी दिवसभर पावसाळ्याप्रमाणेच भुरभुर पाऊस सुरूच होता.

मुलगा जखमी
केजमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. शिरूर, धारूर, गेवराई, पाटोदा, आष्टी, वडवणीतही पावसाने हजेरी लावली. सोनीजवळा शिवारात चाळीस झाडे उन्मळून पडली. पत्र्यावरील दगड पडल्याने करपे वस्तीवरील अनिकेत अरुण करपे हा मुलगा जखमी झाला.