औरंगाबाद - गत १५ दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. मात्र हवामानातील बदलांमुळे पुढील आठ दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. दक्षिण मध्य भारतात कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील भूपृष्ठ भागातील पाण्याचे तापमान वाढले आहे. यामुळे पुढील आठ दिवस महराठवाड्यासह अनेक ठिकाणी अवकाळी
पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ व राज्य हवामान विभागाचे सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.
उमरग्यात शेतकरी ठार : जिल्ह्यात सोमवारपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. उमरगा, तुळजापूर, परंडा भागात पाऊस झाला. उमरगा तालुक्यातील चेंडकाळ शिवारात गोठ्यावर वीज कोसळून शेतकरी ठार तर दोघे जखमी झाले. उमरगा तालुक्यात विविध भागात पाणीच पाणी झाले आहे. वादळी वा-याने अनेक भाागात झाडे उन्मळून पडली असून, घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी सायंकाळी पाऊस सुरू होताच चेंडकाळ शिवारात भास्कर भानदास जाधव,(५०), सोपान सिद्राम जमादार(६५) आणि गोकुळाबाई जमादार(६०) हे तिघे जनावरांच्या गोठ्यात थांबले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास गोठ्यावर वीज कोसळल्याने भास्कर जाधव जागीच ठार झाले तर सोपान आणि गोकुळाबाई जमादार गंभीर
होरपळले.
हिंगोलीतही बरसल्या सरी : कंधारसह हिंगोली शहरात सोमवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने पावसामुळे बाजारकरूंची तारांबळ उडाली. दरम्यान, सायंकाळी नांदेड जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. लोहा तालुक्यात गारपीट झाली. बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमजवळ रविवारपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सोमवारी आंध्र, कर्नाटकात ढगाळ वातावरण होते. ४८ तासांत वातावरण कायम राहण्याची शक्यता असून मराठवाड्यात काही ठिकाणी हलका वा मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचे एमजीएम खगोलशास्त्र व अंतराळ तंंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
अल निनो चक्रीवादळाची भीती
दोन दिवसांपूर्वी हवेचा दाब १००८ ते १०१० हेप्टा पास्कल होता. त्यात ०२ ते ०४ हेप्टा पास्कल हवेचा दाब कमी होऊन तो १००६ हेप्टा पास्कलवर घसरला आहे. हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राचे तापमान ३०२ व ३०३ अंश केलव्हिनवर पोहोचले आहे. यामुळे राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. पण याचा मान्सूनवर परिणाम होणार नसून अल निनो चक्रीवादळाचाच जास्त धोका आहे. डॉ. रामचंद्र साबळे, राज्य हवामान सल्लागार