आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पावसाचा पिकांना फटका; शेतकऱ्यांसमोरील अडचणीत भर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - जिल्हाभरात बुधवारी (दि.१४) पहाटेपासून अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत भर पडली आहे. वातावरणातील या अचानक झालेल्या बदलामुळे जिल्ह्यातील तूर, कांदा, कापूस व द्राक्ष आदींना मोठा फटका बसणार असल्याचे दिसत असून दुसरीकडे रब्बीची ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांना मात्र या वातावरणाचा फायदा होणार आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तामिळनाडूसह आंध्र किनारपट्टीला वादळासह पावसाचा तडाखा बसला आहे. याच कमी दाबाच्या पट्ट्याचा मराठवाड्यासह परिसरातील हवामानावरही परिणाम झाला आहे. यातूनच बुधवारी पहाटेपासून उस्मानाबादसह जिल्हाभरात कमी-अधिक प्रमाणात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण व वातावरणातील गारठाही प्रचंड वाढल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात तूर, कांदा, कापूस या पिकांसह द्राक्षांचेही मोठे उत्पादन घेतले जाते. या वातावरणाचा सर्वाधिक फटका याच पिकांना बसणार असल्याचे दिसत आहे. तुरीचे पीक सध्या शेंगांनी बहरले असून काढणीला आलेले आहे. मात्र, पावसामुळे वरची टरफले फुटून शेंगांना तसेच पिकाला कीड लागण्याची शक्यता आहे. कापूसही सध्या वेचणीला असून पावसाचा व वातावरणातील गारठ्याचा कापसालाही मोठा फटका बसणार आहे. कांदा पिकाची काढणी सुरू असल्याने या पावसामुळे तो सडण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे अगोदरच अडचणीत असलेल्या द्राक्ष उत्पादकांसमोरही या पावसासह गारठ्यामुळे मोठे संकट उभे ठाकले आहे. हे वातावरण आणखी दोन दिवस कायम राहिले तर निसर्गाच्या कोपाचा पुन्हा शेतकऱ्यांनाच फटका बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

ज्वारी, हरभरा, गव्हाला पोषक वातावरण : एकीकडे काही पिकांचे या अवेळी पावसामुळे नुकसान होणार असले तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे पीक रब्बीच्या ज्वारीला मात्र हा पाऊस तसेच वातावरण पोषक आहे. त्यामुळे रब्बीच्या ज्वारीचा उतारा चांगला मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्याचबरोबर हरभरा व गहू या पिकांनाही हा पाऊस व वातावरण पोषक असल्याने ज्यांच्याकडे तूर, कांदा, कापूस तसेच ज्वारी, हरभरा, गहू अशी दोन्ही पिके आहेत त्यांना कहीं खुशी कहीं गम म्हणण्याची वेळ आली आहे.

१४ हेक्टरवरील तुरीच्या पिकाला परंड्यात फटका : परंडा तालुका व परिसरात सर्वत्र ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे तूर, कांदा, कापूस तसेच द्राक्षबागांना नुकसान होण्याचा संभव असून ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांना पोषक वातावरण आहे. तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीचे पीक आहे. कांदा २४०० हेक्टर क्षेत्रावर असून त्याची काढणी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने कांद्यालाही फटका बसला आहे. परंडा तालुक्यात असलेल्या ८० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे २०,५४० हेक्टर क्षेत्रावरील रब्बी ज्वारीचे पीक सध्या जाेमात असून वातावरणातील गारवा ज्वारीस पोषक असल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. हरभरा ३३४० हेक्टरवर आहे, तर गहू २९२० हेक्टर क्षेत्रावर आहे. या पिकांना पोषक वातावरण असून १३०० हेक्टरवरील कापसाला मात्र ऐन वेचणीत आलेल्या पावसामुळे फटका बसू शकतो.
५९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फायदा
कळंब तालुक्यात विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बीतील काही पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. तालुक्यात जवळपास ५९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे या पिकांना फायदा होणार आहे.
तुरीचे मोठे नुकसान
या अवेळी पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे तूर, द्राक्ष, कांदा, कापूस आदी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामध्ये तुरीचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या औषधांची फवारणी करून घ्यावी.
-शिरीष जमदाडे, कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी
बातम्या आणखी आहेत...