आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यावर अस्मानी संकट : अवकाळीचा उच्चांक; तिघांचा बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी व शुक्रवारी अवकाळी पाऊस झाला. जालना जिल्ह्यात शुक्रवारी वीज पडून दोन जणांचा तर नांदेडमध्ये एकाचा मृत्यू झाला. या पावसाने ज्वारी, गहू, हरभरा व आंब्याचे नुकसान झाले आहे.

उस्मानाबाद शहरासह परिसराला गुरुवारी सायंकाळी जवळपास दोन तास अवकाळी पावसाने झोडपून काढले. उस्मानाबाद शहरात दहा तासांमध्ये ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २० वर्षांत अवकाळी पावसाची एप्रिलमधील ही सर्वाधिक नोंद आहे. या पावसामुळे उस्मानाबाद शहरासह जवळच्या वडगाव, सांजा, सकनेवाडी, सारोळा, उपळा, खेड या भागामध्ये ज्वारी पिकाचे व आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. हा अवकाळी पाऊस जिल्हाभर कमीअधिक प्रमाणात होता.

एप्रिल महिना. उन्हाळ्याचे दिवस. एकीकडे अंगाची लाही-लाही करणारे ऊन पडत असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे आजारी पडणार्‍यांचेही प्रमाण वाढत आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उस्मानाबाद शहर व परिसरात जोरदार वार्‍यासह अवकाळी पावसाला प्रारंभ झाला. तब्बल दीड तास जोरदार वारे व पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या पावसामुळे शहर व परिसरातील रब्बीच्या ज्वारीचे व हरभरा, आंब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्यामध्ये पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाचे पीकच अनेकांना घेता आले नाही. त्यानंतर परतीच्या पावसाच्या भरवशावर अनेकांनी उशिराने रब्बीची ज्वारी, हरभरा आदींची लागवड केली असून सध्या ही ज्वारी काढणीचे काम सुरू आहे.

उस्मानाबाद शहर परिसरात व तालुकाभरात शेतशिवारांमध्ये ज्वारीचे पीक कापून ढीग लावण्यात आले असून एक-दोन दिवसात मळणी करण्याच्या तयारीत शेतकरी होता. परंतु गुरुवारी सायंकाळी अचानक पावसाने झोडपल्याने काढून टाकलेली ज्वारी, कडबा भिजल्याने मोठे नुकसान झाले. शेतात काढून टाकलेली ज्वारी मातीत मिळाली असून कणसेही काळी पडली आहेत. रब्बीची पेरणी उशिरा झाल्याने सध्या सर्वत्र पीक काढणीचे काम सुरू आहे. यातील बहुतांश पीक काढण्यात आले असल्यामुळे नुकसान टळले असले तरी काढणीच्या शेवटच्या टप्प्यातील ज्वारीच्या पिकाला मात्र फटका बसला आहे.

उस्मानाबादेत पाणीच पाणी
अवकाळी पावसानंतर उस्मानाबाद शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ संजीवन हॉस्पिटलसमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

दहा तासांत ७१ मिमी
उस्मानाबाद शहरात हवामान खात्याच्या वतीने तापमान व पर्जन्यमान नोंदवण्यासाठी जिल्हा परिषद मुलींच्या शाळा येथे यंत्रणा कार्यान्वित आहे. या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी ते शुक्रवारी सकाळीदरम्यान दहा तासांत ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हीच नोंद जवळच असलेल्या खासगी यंत्रणेत १०६ मिलिमीटर इतकी आहे. गेल्या वीस वर्षांत अवघ्या १० तासांत उस्मानाबाद शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झालेली नाही, अशी माहिती हवामान खात्यासाठी नोंद घेणारे शिक्षक भड यांनी सांगितली.

जालना जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू
वीज पडून दोघांचा मृत्यू, तर दोघे जखमी झाल्याची घटना बदनापूर तालुक्यातील घोटण व लक्ष्मण तांडा येथे शुक्रवारी दुपारी घडली. योगेश चव्हाण (२५, लक्ष्मण तांडा) व रंजित भागचंद मरमत (२२, घोटण) अशी मृतांची नावे आहेत. तर उमेश जगताप (२५) व चंदन शालिग्राम (२८, घोटण) हे जखमी झाले. रंजित मरमत यास मृतावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समजेल, असे येथील डॉक्टरांनी सांगितले.
आठवडाभर आकाश ढगाळ राहणार : चालू आठवड्यात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी पाऊस किंवा साैम्य गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात १० ते १३ एप्रिलदरम्यान सौम्य ते मध्यम गारपीट होण्याची शक्यता आहे, असे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. बी. व्ही. आसेवार यांनी म्हटले आहे.
नायगाव तालुक्यात वीज पडून महिलेचा मृत्यू
नायगाव तालुक्यातील काही गावांत शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमाराला वादळी पावसाने हजेरी लावली. कुंचेली, टाकळी, सेलगाव, कोलंबी या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. कोलंबी येथे दुपारी २ वाजता वीज पडून सयाबाई किशन लांडगे (५०) या महिलेचा मृत्यू झाला. ती शेतात काम करीत असताना ही घटना घडल्याचे तहसीलदार व्ही.बी. मुंडे यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ३.६५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. कंधार येथेही पावसाने हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात मध्यरात्री वादळी पावसाने हजेरी लावली. शहरात तर शुक्रवारी सकाळपर्यंत पावसाची रिमझिम सुरूच होती. त्यातच एलिचपूर येथील २३२ केव्हीच्या सबस्टेशनमध्ये तार तुटल्याने दुपारपासून अर्ध्या शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला.

गंगापूर तालुक्यात दोन बैल दगावले
खुलताबाद तालुक्याचा काही भाग आणि लासूर स्टेशन परिसरात शुक्रवारी हलक्या सरी कोसळल्या. गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा परिसरात विजेची तार तुटल्याने शॉक लागून दोन बैल दगावले. घरावरील पत्रेही उडाली. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाले. सलग दोन वर्षांपासून दुष्काळ आणि अवकाळी पावसाचे दुष्टचक्र सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी काही ठिकाणी १५ ते २० मिनिटेच पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला.