आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात पावसाचा कहर : घरांवरील पत्रे उडाली, फळबागांना फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लातूर, हिंगोली, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांत शनिवारी जोरदार वादळी वार्‍यासह पाऊस झाला. वार्‍याने अनेक घरांवरील पत्रे उडाले. पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. यात शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले.

घरांवरील पत्रे उडाली
लातूर जिल्ह्यातील रेणापूर, जळकोट आणि अहमदपूर तालुक्यात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वार्‍यासह पाऊस झाला. उर्वरित िजल्ह्यात सोसाट्याचे वादळ सुटले तसेच थंडगार वारे वाहत होते. उदगीर शहरात वार्‍यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले.

फळबागांना फटका
हिंगोली दोन दिवसांपूर्वी वसमत येथे झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे शेतीसह घरादारांचे मोठे नुकसान झाले होते. शनिवारी सायंकाळी जिल्हाभरात वादळी वार्‍यासह एक तास जोरदार पाऊस झाला. या वादळाचा आंबा आणि संत्रा फळबागांनाही फटका बसला असून शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

वीज पडून एक बैल ठार
बीडसह आष्टी, गेवराई, वडवणी, माजलगाव या तालुक्यांना शनिवारी दुपारी वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. बीडमध्ये मुलींच्या शासकीय वसतिगृह परिसरात वादळात झाडांच्या फांद्या तारेवर पडल्याने विद्युत खांब पडला. आष्टी तालुक्यातील टाकळसिंगी येथे छत्रपती विद्यालयातील पत्रे उडून पडले. गेवराई तालुक्यात मानमोडी येथील शेतकरी विष्णू विठ्ठल सपकाळ यांच्या शेतात वीज पडून एक बैल जागीच ठार झाल्याची घटना घडली.

मोसंबीची झाडे मोडली
जालना जिल्ह्यात शनिवारी काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. भोकरदन तालुक्यातील आन्वा, करजगाव, धावडा, रेणुकाई पिंपळगाव येथे दुपारी तासभर जोरदार पाऊस झाला. वादळी वार्‍याने बदनापूर तालुक्यातील गेवराई येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवरील पत्रे उडून गेले. बाजार वाहेगाव येथे वार्‍याने मोसंबीची झाडे मोडली.

द्राक्षबागा झाल्या आडव्या
वाशी येथे व परिसरात शनिवारी (दि. ११) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तालुक्यातील मांडवा येथे सुपारीएवढ्या आकाराच्या गारा पडल्या. वाशी तालुक्यातील म्हसोबाची वाडी, वडजी, तेरखेडा, कडकनाथवाडी, सटवाईवाडी, नांदगाव, खामकरवाडी येथे ९ एप्रिलच्या रात्री वादळी वार्‍यासह पाऊस झाला. यामुळे परिसरातील शेतात उभी असलेली पिके जमीनदोस्त झाली. द्राक्षबागाही जमिनीवर आडव्या झाल्या.

१०.४१ मिमी पाऊस
नांदेड जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशीही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १०.४१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

ग्राहकांची फजिती
सेलू, परभणी व जिंतूर येथे सायंकाळी २० मिनिटे जोरदार वादळी वार्‍यासह पाऊस झाला. परभणी व सेलू येथील आठवडी बाजार असल्याने व्यापारी व ग्राहकांची फजिती झाली.