आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीचा कहर, वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर जिल्ह्याच्या काही भागांत बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर गुरुवारी निलंगा तालुक्यात या पावसाने कहरच केला. वीज पडून शेतकरी ठार झाला, तर चार जनावरेही त्यात दगावली असून अन्य एक तरुण जखमी झाला आहे.

दत्तू कोरे (५०, रा. कोतल शिवणी) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. कोरे व त्यांचा मुलगा अशोक हे दोघे शेतात काम करत असताना दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्यांनी काम थांबवून बांधाच्या कडेला उभे राहिले असता त्यांच्यावर वीज कोसळली. यात दत्तू कोरे व दोन बैल जागीच ठार झाले, तर त्यांचा मुलगा अशोक जखमी झाला. अशोकचा एक पाय भाजला असून त्याला निलंगा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

निलंगा तालुक्यातीलच हाडगा शिवारातही विजांचा कडकडाट झाला. त्यात भगवान क्षीरसागर यांची गाय दगावली, तर निलंगा शहरातील सुरेश माने यांच्या म्हशीवरही वीज पडल्याने तिचाही जागीच मृत्यू झाला. आणखी एका गावात वीज कोसळून २५ शेळ्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. परंतु त्याला महसूल प्रशासनाकडून दुजोरा मिळू शकला नाही. बुधवारी रात्री लातूर परिसरासह उदगीर, रेणापूर, अहमदपूर व औसा तालुक्यात अवकाळी पाऊस होता. रात्रीच्या पावसात अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरात वादळामुळे झाडे उन्मळून पडल्याचे वृत्त असून, घरावरील पत्रेही उडून गेली आहेत. अवकाळी संकटामुळे गुऱ्हाळाला व्यत्यय आला असून आंब्याचेही नुकसान झाले आहे.

उस्मानाबादसह उमरगा, तुळजापूर तालुक्यात पाऊस
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून बुधवारपासूनच पावसासोबत वादळी वारा सुटल्याने बागायतदार शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. गुरुवारीही तुळजापूर, उमरगा, उस्मानाबाद तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला. बदलत्या वातावरणामुळे शेतकर्‍यांना शेतीचे गणित मांडणेही कठीण जात आहे. रब्बीच्या हंगामातच अवकाळी पाऊस होत असल्याने दोन वर्षांपासून पिकांची नासाडी होत आहे. यावर्षीही फेब्रुवारी महिन्यांत अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची अद्याप भरपाई मिळालेली नसतानाच अवकाळीने पुन्हा फळबागांचे नुकसान झाले. आगामी दोन दिवसांत मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आल्याने आंबा, द्राक्षबागांचे नुकसान होण्याचा धोका व्यक्त होत आहे.

अहवाल मागवला
गुरुवारी निलंगा तालुक्यातील अनेक गावांत वादळी पाऊस झाला. काही गावांची माहिती प्राप्त झाली असून, अनेक ठिकाणची माहिती मिळाली नाही. त्यामुळे किती प्रमाणात नुकसान झाले हे समजू शकले नाही. तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना गावांना भेटी देऊन अहवाल देण्याचे सांगण्यात आले आहे. - नामदेव टिळेकर, तहसीलदार, निलंगा