आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाभरात अवकाळी पावसाने पिकांसह फळबागांचे नुकसान, चिंतेत पडली भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हतनूर - चार वर्षांपासून दुष्काळात होरपळत असलेला शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरात शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाने शेतकऱ्यांबरोबरच परिसरातील वीटभट्टीवाल्यांची चांगलीच धांदल उडवली. मागील चार दिवसांपासून विजेचा गडगडाट वादळी वाऱ्यासह परिसरात अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. काही ठिकाणी तुरळक सरीही पडल्या होत्या, परंतु शुक्रवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवलेला चारा ओला झालाच. शिवाय कांदा पिकासह उभा असलेला गहू, हरभरा, कांदा बिजवाई या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना भाकरीची, तर गुरांना वैरणीची चिंता सुरू होणार असल्याचे दिसत आहे.
यावर्षी दुष्काळामुळे गहू, हरभरा या पिकांचे प्रमाण अत्यल्प होते. त्यात काहींची सोंगणी होऊन गंजी होती, तर काहींचे पीक अजूनही शेतात उभेच होते. मात्र, या अवकाळी पावसाने हातात आलेल्या पिकांचे मातेरे केले असल्याचे दृश्य परिसरात दिसत होते. वीटभट्टी चालकांचीदेखील या पावसाने चांगलीच फजिती केली. कच्च्या विटांना पावसापासून वाचवण्यासाठी ताडपत्री टाकून झाकण्यात आले होते, तर काही विटा ओल्या होऊन खराब झाल्याने वीटभट्टीवाल्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.