आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Upasarpanch Husband Fir Tow Round In The Gram Sabha

उपसरपंचाच्या पतीने ग्रामसभेत झाडल्या २ फैरी; तिघांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- भोगाव साबळे (ता. परभणी) येथील ग्रामसभेत प्रजासत्ताकदिनी मंगळवारी शासकीय योजनांच्या कामांवरून दोन गटांत उद‌्भवलेल्या वादानंतर उपसरपंच महिलेच्या पतीने पिस्तुलातून हवेत दोन वेळा फायर केले. यात सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही. पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणून तिघांना अटक केली. दोन्ही गटांकडून दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत.

परभणीपासून जवळच असलेल्या भोगाव साबळे येथे प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणानंतर ग्रामसभा सुरू झाली. सरपंच श्रीमती बायनबाई कठाळू पुंडगे, उपसरपंच आशामती राऊत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभेस सुरुवात झाल्यानंतर गावात शासकीय योजनेतून विशेषत: रोजगार हमी योजनेतून झालेल्या कामांबाबत एका गटाने आक्षेप नोंदवत, त्याबाबतची माहिती विचारण्यास सुरुवात केली. त्यावरून दोन्ही गटांत वाद सुरू झाला. याच दरम्यान, उपसरपंच आशामती राऊत यांचे पती मनोज राऊत (३५) आपल्याजवळील पिस्तूल काढून त्यातून हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या गोंधळात हाणामारी सुरू झाली. गोळीबारातील गोळी सुदैवाने कोणालाही लागली नाही. मात्र, हाणामारीत दोघे जण किरकोळ जखमी झाले. एकाच्या कानाला चाटून ती गोळी गेल्याचे सूत्रांंनी सांगितले. गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर रेड्डी, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्यासह पोलिस फौजफाटा गावात दाखल झाला. दरम्यान, याच प्रकरणात सरपंच बायनबाई पुंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत कल्याण रामराव साबळे याच्यासह अर्जुन रामराव साबळे यांनी जातिवाचक शिवीगाळ करून मागासवर्गीय असताना ध्वजारोहण करून ग्रामसभा का घेतली, अशी विचारणा करत लाठ्या,काठ्या व दगडाने मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यावरून कल्याण साबळे व अर्जुन साबळे यांना अटक केली आहे.

या प्रकरणात बाबाराव रुस्तुमराव साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत मनोज राऊत याने दोन वेळा गोळीबार करून आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटल्यावरून राऊत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मनोज राऊतला अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर रेड्डी अधिक तपास करत आहेत.