आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएससीतील गुणवंतांचे बोल: ‘गडचिरोली, गोंदियात मिळावी कामाची संधी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई- राज्यातील अनेक जिल्हे अत्यंत मागास आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केडर तर मिळावेच शिवाय गडचिरोली, भंडारा अशा जिल्ह्यांत काम करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा डॉ. विजय चंद्रकांत राठोड यांनी व्यक्त केली. गुरुवारी यूपीएससीचे निकाल जाहीर झाले. या परीक्षेत डॉ. विजय राठोड यांनी देशातून 84 वा क्रमांक पटकावला.

सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात कार्यरत असणारे डॉ. राठोड मूळचे ठकारवाडीचे (ता. गेवराई, जि. बीड) रहिवासी आहेत. या यशाबाबत माहिती देताना ते म्हणाले, आयएएस होणारा मी कुटुंबातील पहिलाच. कुटुंब सोडले तर बहुतांश नातेवाईक आजही ऊसतोड करतात. त्यांचे हाल लहानपणापासून पाहत होतोच. शिवाय दहावीत असतानाच आपण देशासाठी काहीतरी करावे, अशी इच्छा मनात होती. 2005 मध्ये बीड शहरातील बलभीम महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झालो. या परीक्षेत 93.33 टक्के गुण मिळवत जिल्ह्यातून पहिला आलो. याच वेळी ही इच्छा आणखी प्रबळ झाली. 2011 मध्ये एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये रुजू झालो. त्यासोबत ज्ञानप्रबोधिनीमध्ये अभ्यास करण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या व्यथा जवळून अनुभवल्यानंतर त्यांच्यासाठी आपणच काहीतरी केले पाहिजे, याची जाणीव झाली. त्यामुळे झपाटून अभ्यासाला लागलो आणि आज हे यश मिळाले. मोठ्या शहरांमधील नागरिक आपल्या हक्कांबाबत सजग आहेत. मात्र, ग्रामीण भागाची परिस्थिती भयावह आहे. त्यांना आपल्या अधिकारांचीही जाणीव नाही. मागास भागात कामाची संधी मिळावी, अशी इच्छा आहे, असे डॉ. राठोड यांनी सांगितले. या परीक्षेचा अभ्यास करणारे अनेक जण क्लासेस लावतात, निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करतात. तरी त्यांना अपयश येते. कारण या परीक्षेत तुम्ही किती वेळ अभ्यास करताय यापेक्षा कसा आणि किती स्पष्ट ध्येय ठेवून करतात हेच महत्त्वाचे ठरते. यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आकलनशक्ती वाढवावी, असा सल्लाही डॉ. विजय राठोड यांनी दिला.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, अभ्यासानेच मिळाले यश : अक्षय तापडिया