आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झेडपीत भरली उर्दू शाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जाफराबाद तालुक्यातील मंगरूळ जिल्हा परिषद शाळेत 4 वर्षांपासून एकच शिक्षक कार्यरत आहे. वारंवार निवेदनाद्वारे मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने पालकांनी गुरुवारी थेट जिल्हा परिषदेच्या सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांच्या दालनाबाहेर व प्राथमिक शिक्षण विभागात शाळा भरवून आपला रोष व्यक्त केला. यामुळे जिल्हा परिषदेत दिवसभर हाच विषय चर्चेत होता.
मंगरूळ येथे जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा असून यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग चालतात. गेल्या चार वर्षांपासून या आठ वर्गांसाठी फक्त एक शिक्षक नियुक्त आहे. शाळेची एकूण पटसंख्या 62 असून यानुसार 4 शिक्षकांची गरज आहे. नियमानुसार दोन पदवीधर तर दोन सहशिक्षक असावे. मात्र, जिल्हा परिषदेकडून याकडे सर्रास दुर्लक्ष होते. वारंवार शिक्षकाची मागणी करूनही फक्त आश्वासने दिली जातात. दरम्यान, 23 जून रोजी सीइओंना निवेदन देऊन शिक्षक देण्याची मागणी केली होती. शिवाय, शिक्षक न दिल्यास 26 जूनपासून शिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरविण्याचा इशारा दिला होता. तरीही दिरंगाईचे ग्रहण लागलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी संतप्त पालकांनी थेट टेम्पोमध्ये मुलांना आणले व जिल्हा परिषद सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांच्या दालनाबाहेर व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात शाळा भरवली.
शिक्षण हक्क कायदा कागदावरच
शिक्षण हक्क कायद्यान्वये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, अशी तरतूद आहे. मात्र, चार वर्षे एकाच शिक्षकावर आठ वर्ग चालत असतील तर गुणवत्ता राहणार कशी हा अनुत्तरित प्रश्न आहे.

जिल्ह्यात 34 शिक्षकांची पदे रिक्त
४जिल्ह्यात 34 शिक्षकांची पदे रिक्त असून 30 शिक्षक मिळाले आहेत. 30 जनूपर्यंत सर्व शिक्षक नियुक्त होतील. यात मंगरूळचाही समावेश आहे.
वर्षा देशमुख, शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद जालना

दोन दिवसांत शिक्षक

४उर्दू शिक्षकांचे प्रकरण न्यायालयात होते. मात्र, आता न्यायालयाचा निकाल लागला असून जिल्ह्यासाठी 30 शिक्षक मिळाले आहेत. यातूनच मंगरूळ येथील उर्दू शाळेत दोन शिक्षक नियुक्त केले जाणार आहे. पालकांना याबाबत सांगितले आहे.
अशोक राऊत, प्रभारी शिक्षणाधिकारी,जि.प.
फोटो - मंगरूळ येथील उर्दू शाळातील विद्यार्थ्यांसह पालकांनी सीईओंच्या दालनासमोर शाळा भरवली.