आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बासर येथे पुष्कर मेळा; २५ लाखांवर भाविक येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - बासर येथील सरस्वती देवीच्या मंदिरात दि. १४ ते २५ तारखेच्या दरम्यान पुष्कर मेळा भरत आहे. या निमित्ताने या वर्षी बासरमध्ये २५ लाखांहून अधिक भाविकांची गर्दी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देशात सरस्वतीची केवळ दोनच मंदिरे आहेत. एक जम्मू-काश्मीर व दुसरे बासरला. कुरुक्षेत्राच्या लढाईनंतर महर्षी व्यास व विश्वामित्र अरण्यात तपस्येला निघाले. दंडकारण्यातील बासर येथे त्यांनी तपश्चर्येसाठी स्थान निवडले. त्याचे नाव वसरा होते. पुढे मराठी भाषकांनी त्यांचे बासर असे केले. महर्षी व्यास दररोज गोदावरीत स्नान करून एक मूठ वाळू आणत. त्याच वाळूतून त्यांनी देवी सरस्वतीची मूर्ती तयार केली. तपश्चर्येनंतर दोन्ही मुनी निघून गेले. कालांतराने सरस्वती देवीची प्रतिष्ठापना करून मंदिर बांधले. नांदेडच्या नंदगिरी राजाने हे मंदिर बांधले.

मंदिर परिसरात विकास कार्य
अटलजींच्या काळात बासर येथे गोदावरी नदीचा घाट बांधण्यात आला. त्यानंतर सन २००३ मध्ये चंद्राबाबू नायडू यांनीही मंदिर परिसराचा विकास करून घाट बांधकाम केले. सद्य:स्थितीत ५२२ मीटर लांबीचा घाट बांधून तयार आहे. अजूनही विकासकामे सुरू आहेत.

शेकडो वर्षांची परंपरा
बासर येथे दर बारा वर्षांनी पुष्कर मेळा भरतो. ही परंपरा मंदिराच्या स्थापनेपासून आहे. त्याचा इतिहास ज्ञात नाही; परंतु जो ज्ञात इतिहास आहे, त्यानुसार या वर्षी पुष्कर मेळ्याचे १४४ वे वर्ष आहे. या पर्वात गोदावरीत स्नान करतात. सरस्वतीचे दर्शन घेतात. काही लोक येथे तर्पण करतात. पिंडदान करतात. येथे पिंडदान केल्याने काशीला पिंडदान केल्याचे पुण्य प्राप्त होते, अशी आख्यायिका असल्याची माहिती मुख्य पुजारी शरद पाठक यांनी दिली.

कडक सुरक्षा व्यवस्था
मेळ्यासाठी ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. भाविकांसाठी २९ गेस्ट हाऊस व १०० भक्तनिवासाच्या खोल्या बांधण्यात आल्याचे पाठक म्हणाले. आदिलाबादचे जिल्हाधिकारी जगनमोहन ३ दिवसांपासून बासरला आहेत.

पहिला श्रीगणेशा गिरवला जातो
मुलाला शाळेत टाकण्यापूर्वी अनेक पालक आवर्जून बासर येथे सरस्वती देवीच्या मंदिरात दर्शनाला आणतात. या ठिकाणी त्याच्या हाती पाटी-पेन्सिल देऊन पहिला श्रीगणेशा गिरवला जातो. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी दूरच्या प्रांतातून दरवर्षी भाविक येथे दर्शनाला येतात.