आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत २५० मूर्तींचे संवर्धन, ५० गणेश मंडळांनी टाळले विसर्जन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - दैनिक ‘दिव्य मराठी’ने राबविलेल्या अभियानाला प्रचंड मोठे यश आले असून पर्यावरण, आर्थिक नुकसान आणि विटंबना टाळण्यासाठी मूर्तींचे विसर्जनच करायचे नाही, असा निर्णय घेऊन उस्मानाबादेतील ५० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी परिवर्तनाच्या वाटेवर महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. त्याची सुरुवात यावर्षी झाली. रविवारी झालेल्या मूर्ती विसर्जनानंतर ४२ सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती पालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्या असून, ८ मंडळांनी मूर्तींचे आदानप्रदान केले आहे. त्यामुळे शहरातील ५० मंडळांचे पर्यायाने गणेशभक्तांचे सुमारे १५ लाख रुपये वाचले आहेत. शहरातील २०० कुटुंबांनी घरातील गणेशमूर्ती दान केल्या आहेत. महाराष्ट्रात प्रथमच असा प्रयोग राबविण्यात आला.
शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर समता कॉलनीतील पालिकेच्या विहिरीत मूर्तींचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. या विहिरीला पाणी नसल्यामुळे बाहेरून पाणी टाकले जाते. विसर्जनापूर्वी काही दिवस अगोदर या विहिरीतील गाळ काढला जातो. मात्र, गाळासोबत गणेशाच्या अनेक मूर्ती बाहेर येतात. त्यापैकी काही मूर्तीची तुटफूट झालेली असते. तो गाळ तसाच पडून राहतो. परिणामी मूर्तीची विटंबना होते. यावर्षीही असाच प्रकार घडला, मात्र यापुढच्या काळात गणपती मूर्तींची विटंबना होऊ नये, यासाठी ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेऊन अभियान चालविले.
२२ सप्टेंबर रोजी ‘आणखी किती दिवस बाप्पांची विटंबना’या मथळ्याखाली पहिली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील गणेश मंडळांनी आणि नगरपालिकेने सकारात्मक भूमिकेतून पुढाकार घेतला. त्यावर ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात टॉक शो घेण्यात आला. या चर्चेदरम्यान बहुतांश गणेश मंडळांनी मूर्तीचे विसर्जन टाळण्याचा निर्णय घेतला. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी मंडळांना मूर्ती ठेवण्यासाठी मेाफत जागा देण्याची तयारी दाखविली. त्यानंतरही ‘दिव्य मराठी’चा पाठपुरावा सुरूच राहिला. गणेश विसर्जनाच्या दिवसापर्यंत प्रत्यक्षात ३० मंडळांनी मूर्तीचे विसर्जन करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, अखेरच्या क्षणी प्रत्यक्षात ५० मंडळांनी मूर्तीचे विसर्जन केलेले नाही. ४२ मंडळांनी पालिकेच्या ताब्यात मूर्ती दिल्या असून, या मूर्ती ५ फुटांपासून १५ फुटांपर्यंत आकाराच्या आहेत. या मूर्ती पुढच्या वर्षी संबंधित मंडळांना परत देण्यात येणार आहेत.
काही मंडळांना मूर्तीचे आदानप्रदान करायचे असल्यास तसा पर्यायही पालिकेने समोर ठेवला आहे. एकंदर मूर्तीचे विसर्जन टाळून नव्या दिशेने वाटचाल करण्याचा उस्मानाबादकरांचा हा गुण वाखाणण्याजोगा असून, या उपक्रमाचे खासदार प्रा.रवींद्र गायकवाड, माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, प्रभारी मुख्याधिकारी राजेश जाधव यांनी कौतुक केले आहे. शहरात ५० ते ६० सार्वजनिक गणेश मंडळांची नोंद होते. यावर्षीही ६० मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना केली होती. पैकी ४२ मंडळांनी मूर्तीचे विसर्जन न करता या मूर्ती पालिकेच्या नाट्यगृहातील सभागृहात ठेवल्या आहेत, तर ८ मंडळांनी मूर्तीची देवाणघेवाण केली. या मूर्तींचे जतन करण्यात आल्यामुळे जलप्रदूषण तर वाचेलच पण मंडळांची सुमारे १५ लाख रुपयांची बचत झाली. मूर्ती पालिकेने सभागृहात प्लास्टिक कागदामध्ये व्यवस्थित बांधून ठेवल्या असून, कुठल्याही मोदबल्याशिवाय संबंधित गणेश मंडळांना पुढच्या वर्षी परत करण्यात येणार आहेत.

अगोदर विरोध, आता पुढाकार
दैनिक ‘दिव्य मराठी’ने ही संकल्पना मांडल्यानंतर प्रथम त्याला विरोध झाला होता. मात्र, ही संकल्पना फायद्याची कशी आहे, यासंदर्भात जनजागृती करण्यात आली आणि या मोहिमेला अभूतपूर्व यश आले. पुण्यात मानाच्या गणेश मंडळांनी कृत्रिम तलावात केलेले गणेश विसर्जन असो किंवा इको फ्रेंडली गणेश मूर्ती.

जालन्यात पर्यावरणपूरक विसर्जन
जालना | ‘दिव्य मराठी’च्या अभियानानंतर जालनेकरांनी इको फ्रेंडली गणेश विसर्जनासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. १ हजार २६० गणेशभक्तांनी मूर्तींचे मोती तलावात विसर्जन न करता त्या मूर्ती पर्यावरणपूरक विसर्जनासाठी सृष्टी फाऊंडेशन आणि राष्ट्रीय हरित सेनेच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केल्या. त्याशिवाय शहरातील जवळपास तीन हजार नागरिकांनी घरीच टब किंवा बकेटमध्ये विसर्जन केले.

परस्पर संमतीने मूर्तींचे आदान-प्रदान
पालिकेकडे सुपूर्द करण्यात आलेल्या गणेशमूर्ती संबंधित मंडळांना परत दिल्या जातील. ज्या गणेश मंडळांना मूर्तीचे आदानप्रदान करायचे असेल त्यांनी करावे. ज्यांना मूर्ती परत न्यायच्या नसतील, त्यांच्या मूर्ती मंडळाची संमती घेऊन ग्रामीण भागातील मंडळांना दान देण्यात येतील.
मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्षपरस्पर संमतीने मूर्तींचे आदान-प्रदान

पालिकेकडे सुपूर्द करण्यात आलेल्या गणेशमूर्ती संबंधित मंडळांना परत दिल्या जातील. ज्या गणेश मंडळांना मूर्तीचे आदानप्रदान करायचे असेल त्यांनी करावे. ज्यांना मूर्ती परत न्यायच्या नसतील, त्यांच्या मूर्ती मंडळाची संमती घेऊन ग्रामीण भागातील मंडळांना दान देण्यात येतील.
मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष