आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Usmanabad At Kangare Village Police Attack On People

उस्मानाबादमध्ये पोलिसांची ‘रझाकारी’, दारूबंदीचा आग्रह धरणार्‍या ग्रामस्थांना अमानुष मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - ग्रामस्थांनी दारूबंदीचा आग्रह धरल्यानंतर पोलिसांचा खाक्या जागा झाला आणि दोनशे पोलिसांच्या ताफ्याने गावकर्‍यांना घरात घुसून जनावरांप्रमाणे बेदम मारहाण केली. अमानुष मारहाणीमुळे अनेक ग्रामस्थ जखमी झाले. त्यांना ग्रामीण तसेच बेंबळी पोलिस ठाण्यात डांबण्यात आले आहे. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. हा प्रकार उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथे सोमवारी रात्री घडला. दारूबंदीची मागणी करणार्‍या ग्रामस्थांवर पोलिसांनी हल्ला चढवल्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गावातील काही धाडसी महिलांनी सोमवारी सायंकाळी बेकायदा दारू विक्री करणारा शेषराव लिंबा राठोड याला रंगेहाथ पकडले. त्याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. बेंबळी (ता. उस्मानाबाद) पोलिस ठाण्यातील हवालदार अशोक पवार, किशोर रोकडे, अण्णा भोसले व हरिदास शिंदे पोलिस जीपमधून (एमएच 25 सी 6420) कनगरा येथे दाखल झाले. त्यांना पकडलेली दारू दाखवण्यात आली. मात्र, पोलिस दारू विक्रेत्याला पाठीशी घालण्यासाठी ग्रामस्थांनाच उलटसुलट प्रश्न विचारत सुटले. यामुळे पोलिस व ग्रामस्थांमध्ये वाद सुरू झाला. नंतर वादाचे पर्यावसान झोंबाझोंबीत होऊन हाणामारीत झाले. 10 ते 15 युवकांनीही प्रतिकार करत पोलिसांवर प्रतिहल्ला चढवला. हात धुऊन घेण्यासाठी गावातील काही टवाळखोरही यामध्ये सहभागी झाले. त्यांनी चौघा हवालदारांना बेदम मारहाण केली. यादरम्यान शिंदे यांनी वायरलेसवरून घटनेबाबत पोलिस मुख्यालयाला कळवले. त्या वेळी बेंबळी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे हे सहा कर्मचार्‍यांसह गावात आले. सुरुवातीला स्वत: बनसोडे जमावाच्या दिशेने जाऊ लागले. तेव्हा त्यांच्यावर टवाळखोरांनी दगडफेक सुरू केली. त्यांच्या डोक्यात दगड लागल्यामुळे कर्मचार्‍यांनी लाठीहल्ला सुरू केला. ग्रामस्थांवर कारवाईसाठी उस्मानाबादहून जादा कुमक मागवण्यात आली. सुमारे 200 पोलिस कर्मचारी काही वेळातच गावात दाखल झाले. चौकशी न करताच निरपराध ग्रामस्थांना ताब्यात घेणे सुरू केले. ताब्यात घेत असताना जनावरांप्रमाणे लाठीने मारहाण करत वाहनांमध्ये कोंबण्यात येत होते. अंधारात महिला, लहान मुले यांचाही विचार न करता प्रत्येकाला झोडपून काढत सापडेल त्याला ताब्यात घेण्यात आले. या वेळी महिला, लहान मुलांच्या किंकाळ्या सुरू होत्या. पोलिसांचा हा रझाकारी प्रताप अत्यंत चीड आणणारा आणि सुन्न करणारा होता. त्यामुळे ग्रामस्थांनी घरे सोडून अंधारात शेतात पळ काढला. मध्यरात्री 12 वाजेपासून पहाटे चारपर्यंत प्रत्येक घरात शोध घेऊन मिळेल त्याची धरपकड करण्यात आली. आठ महिलांसह 54 जणांना ताब्यात घेतल्यानंतरच पोलिसांच्या रक्ताळलेल्या लाठय़ा थांबल्या. बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दिवसभर सुरू होती. दरम्यान, 47 जणांची सुटका करण्यात आली.
उपस्थित ग्रामस्थांपैकी काहींनी अगोदर पकडलेली सर्व दारू मुद्देमाल म्हणून दाखवून विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या वेळी पोलिसांनीच पकडलेल्या दारूचा छोटासा पिंप उलटून दिला. ‘आता कोठे आहे दारू, कारवाई कशी करायची?’ असा प्रश्न विचारून कारवाई करण्यास टाळाटाळ केली. हा प्रकार सिनेस्टाइल घडत होता. मोठय़ा धैर्याने पकडलेली दारू पोलिसांनीच उलटून दिल्यामुळे व्यथित झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांना जाब विचारला. पोलिस दारू विक्रेत्याला पाठीशी घालत असल्याचे लक्षात आल्यानंतर हतबल झालेल्या ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. तेव्हा एका पोलिस कर्मचार्‍याने दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एक महिलेला ओढून गळ्यातील मंगळसूत्र ओढले. यामुळे संतापलेल्या युवकांनी पोलिसांना मारहाण सुरू केली.

एसपींचा बोलण्यास नकार
यासंदर्भात उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी लेखी स्वरूपात प्रतिक्रिया देतो, असे सांगून बोलण्यास नकार दिला.
ग्रामस्थांनी पकडून दिलेली दारू पोलिसांनीच केली नष्ट

पोलिसांच्या रझाकारीची आणखी छायाचित्र पुढील स्लाइडमध्ये...