आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गौरच्या सात शूरवीर हुतात्म्यांच्या बलिदानाचा शासनाला विसर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येरमाळा/ उस्मानाबाद - मराठवाडा मुक्ती संग्रामात प्राणांची आहुती देणार्‍या कळंब तालुक्यातील गौर येथील सात शूर हुतात्म्यांचा शासनाला विसर पडला आहे. त्यांच्या स्मृती ताज्या राहण्यासाठी येथे बांधलेल्या हुतात्मा स्मारकाची दुरवस्था झाली आहे. त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असून स्मारकाच्या संरक्षणाकरिता कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी होत आहे.

रझाकारांना सळो की, पळो करून सोडणार्‍या सात हुतात्म्यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी दोन एकर जागेत हुतात्मा स्मारक बांधण्यात आले आहे. मात्र, शासकीय उदासीनतेमुळे गेल्या 10 वर्षांपासून स्मारक अनेक असुविधांच्या गर्तेत सापडले आहे. स्मारकाच्या छताची मोठी पडझड झाली आहे. स्मारकाच्या भिंतीही कोसळल्या आहेत. फरशी उखडलेली आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. येथे देखरेख करण्यासाठी कोणाचीही नियुक्ती नाही. यामुळे दिवसेंदिवस स्मारकाची दुरवस्था होत आहे. राष्ट्रीय सणालाच ध्वजवंदनासाठी स्मारकाची साफसफाई करण्यात येते. तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात येते. त्यानंतर मात्र याकडे संपूर्ण दुर्लक्ष होते.

सातजणांचे हौतात्म्य
निजामकालीन वतनदार गाव गौरमध्ये रझाकाराचे ‘रुहीला’ (सावकार) ठाणे होते. आंबादास गंगाधर कुलकर्णी, पांडुरंग शिवराम धनगर, रामभाऊ हरी धनगर, दशरथ आबा लंगडे, पांडुरंग अण्णा लंगडे, आंबादास शंभू माळी, विठ्ठलराव भगवानराव पाटील यांनी रझाकारास सळो की पळो करून सोडले. वैतागलेल्या रझाकारांनी 700 जणांची फौज मागवून सात जणांना पकडले. तेरणा नदीच्या काठावर त्यांना गोळ्या घालून ठार केले. त्यांचे मृतदेह कडब्याच्या गंजी पेटवून त्यात टाकण्यात आले.

साहित्यांची चोरी
येथील विजेची उपकरणे म्हणजेच पंखे, ट्यूब, बल्ब व अन्य साहित्य चोरून नेण्यात आले आहे. तसेच दरवाजे व खिडक्यांचीही मोडतोड झाली आहे. या स्मारकाच्या देखभालीसाठी येथील कायमस्वरुपी कर्मचारी व रखवालदार नियुक्त करण्याची आवश्यकता आहे.

स्मारकाच्या देखभालीसाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. डागडुजी व देखभाल निधीसाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.’’ डी. एम. शिंदे, प्रभारी तहसीलदार.

एक महिन्यापूर्वी येथील स्मारकासंदर्भातील अहवाल पाठवण्यात आला आहे. यात देखभालीसाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.’’ जी. डी. कदम, मंडल अधिकारी.

येथील स्मारक गाव व परिसरातील नागरिकांचे प्रेरणास्रोत आहे. भावी पिढीला हुतात्मे व मराठवाडा मुक्ती संग्रामाची सातत्याने माहिती मिळावी यासाठी स्मारकाचे जतन आवश्यक आहे.’’ रमेश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य.