आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदी- विक्री संघ निवडणूक, अंतिम मोर्चेबांधणीच्या हालचाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेची ५ जुलैला निवडणूक होत आहे. १५ संचालकपदांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत जवळ आल्याने निवडणूक लढतीच्या अंतिम मोर्चेबांधणीच्या हालचालींना सेना-काँग्रेस या पक्षाकडून सोमवारी वेग देण्यात आला.

काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यावर भर दिला, तर सेनेनेही उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. बुधवारी उमेदवारी माघार घेण्याच्या अंतिम दिनी निवडणुकीत आघाडी करायची की स्वबळावर लढायचे ही भूमिका जाहीर होणार आहे.

तालुका खरेदी-विक्री संघाची तब्बल एक तपानंतर निवडणूक होत आहे. संस्थेच्या एकूण १५ संचालकपदांसाठी ९४ जणांनी १०२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत सेना-काँग्रेस युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरुवातीपासून होत आहे. त्या अनुषंगाने हालचालीही घडत आहेत, तर दुसरीकडे भाजपतील इच्छुकांनीही या निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. सेना-काँग्रेसची युती झाल्यास स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीशी घरोबा करण्याचा दबाव कार्यकर्त्यांनी नेत्यांवर आणला आहे, तर तालुक्यातील काही दिग्गज मात्र संघाची आर्थिक परिस्थिती पाहता बिनविरोध निवडणूक होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी संधान साधत आहेत. यात राष्ट्रवादीने विधानसभा सदस्यत्व आपल्याकडे असल्याने आपल्या पदरात जास्तीच्या जागा टाकण्याची मागणी केली आहे.

देशात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला दखलपात्र जागा सोडाव्यात, अशी भूमिका घेतली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सूत जुळलेल्या सेना व काँग्रेसच्या नेत्यांनी समाधानकारक जागा दिल्यास चर्चेची तयारी करू, अन्यथा पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून देऊ, अशी कडक भूमिका घेतली आहे. संघाच्या निवडणुकीत सोसायटीचे ११३ व वयक्तिक असे एकूण ३ हजार १०८ मतदार आहेत. त्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदारांनी सेना व काँग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.

इच्छुकांच्या मुलाखतीची औपचारिकता पूर्ण
सोमवारी काँग्रेसचे डॉ. दिनेश परदेशी, मनसुख झांबड, प्रशांत सदाफळ, नगरसेवक उल्हास ठोंबरे, सारंगधर डिके आदींनी निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीची औपचारिकता पूर्ण केली. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे यांच्या निवासस्थानी प्रमुख पदाधिकार्‍यांची निवडणुकीबाबत सल्लामसलत झाल्याचे समजते.

निकम यांच्यावर मदार
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना व काँग्रेसकडून स्वतंत्ररीत्या उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. या दोन्ही पक्षांत आघाडी करण्यासाठी बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. आसाराम रोठे हे सेनेकडून, तर माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी हे काँग्रेसकडून चर्चा करीत असून बाजार समितीचे संचालक तथा सेनेच्या वाटेवर असलेले संजय निकम हे दोन्हीकडून बाजू सांभाळत आहेत. जागावाटपात दोन्ही पक्षांना समान न्याय देण्याची महत्त्वाची जबाबदारी निकम यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...