आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकाभिमुख उपक्रम : वैजापूर नगरपालिका आता बांधणार "घर तेथे शौचालय'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - राज्य शासनाच्या "स्वच्छ नागरी अभियान' अंतर्गत नगरपालिका प्रशासनाने शहरातील नागरी वसाहतीत "घर तिथे शौचालय' बांधणीचा लोकाभिमुख उपक्रम हाती घेतला आहे. यात राज्य शासनाने पालिकेला नागरी भागात २ कोटी ३२ लाख ९२ हजार रुपये निधीच्या भरीव तरतुदीतून १ हजार ९४१ नवीन शौचालय बांधणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत उद्दिष्टपूर्ती करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे अभियान यशस्वी झाल्यास वैजापूर पालिकेची शंभर टक्के शौचालय असलेल्या शहरात गणना होणार आहे.

शहरी भागात विविध नागरी वसाहतीतील रोगराई निर्मूलन व आरोग्य सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने "स्वच्छ नागरी अभियान' ही महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमात शहरात २०११ या वर्षात कुटुंबाचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार शौचालय नसलेल्या कुटुंबाला १२ हजार रुपयांचे विशेष प्रोत्साहनपर अनुदान नवीन शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी देण्यात येणार आहे. विशेषत: अनुदानाची रक्कम पात्र लाभार्थींच्या राष्टीयीकृत बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. अभियानात नवीन शौचालय बांधकाम करण्यासाठी लाभार्थी हा पालिका क्षेत्रातील रहिवासी असावा व त्याचे स्वत:चे घर असणे बंधनकारक आहे. पालिकेने अभियान प्रभावीपणाने राबवण्यासाठी पालिकेत विशेष कक्ष सुरू केला आहे. या कक्षात लाभार्थींकडील अर्ज स्वीकारण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सध्या कागदावर लाभार्थीने अर्ज दाखल केल्यानंतर पालिकेचे कर्मचारी स्थळ पाहणी पूर्ण करतील. त्यानंतर पालिकेकडे लाभार्थी पात्र की अपात्र यांच्या अहवालानंतर निवड झालेल्या पात्र लाभार्थींच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील अनुदानाची ५० टक्के रक्कम जमा करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे
स्वच्छ नागरी अभियानात १२ हजार रुपये निधीची तरतूद असलेल्या नवीन शौचालय बांधणीसाठी लाभार्थी हा पालिका क्षेत्रातील रहिवासी असला पाहिजे. स्वत:चे घर अथवा जागा उपलब्ध पाहिजे, राष्ट्रीयीकृत बँकेत खाते तसेच निवडणूक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. सध्या कागदावर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी पालिकेकडे अर्ज दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

विशेषत: प्रथम येईल त्याला लाभ याप्रमाणे लाभार्थीची प्राधान्यक्रमाने पात्र की अपात्र याची शहानिशा झाल्यानंतर ५० टक्के निधी शौचालय बांधणीसाठी बँक खात्यावर जमा करण्याची कारवाई पालिका प्रशासन करणार आहे.

शौचालयाची स्थिती
शहरात सन २०११ च्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार एकूण ९ हजार ६५० मालमत्ताधारकांकडे ७,५०० वैयक्तिक शौचालय आहेत. तसेच समाजकल्याण विभागाच्या अर्थसाह्य योजनेतून बांधकाम करण्यात आलेल्या ९० सदनिका, झोपडपट्टी निर्मूलन कार्यक्रमातील १२५ सदनिकेत शौचालयाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

शहर होणार शंभर टक्के शौचालययुक्त
स्वच्छ नागरी अभियानात शहराची एकूण लोकसंख्या ४१ हजार २९६ आहे. पालिका क्षेत्रात नवीन १,९४१ शौचालय बांधणीसाठी एकूण २ कोटी ३२ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे.

नागरिकांनी अर्ज करावे
^नवीन शौचालय बांधणीचे उद्दिष्ट आहे. ते सर्व काम २ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. उद्दिष्ट पूर्णत्वास गेल्यास शहराची शंभर शौचालये असलेल्या शहरात पालिकेची यादीत नोंद होईल, त्यासाठी नागरिकांनी अर्ज तत्काळ पाठवावेत.
बी. यु. बिघोत, मुख्याधिकारी

शहर सुंदर, रोगमुक्त होईल
^स्वच्छ सुंदर शहर निर्मितीसाठी योजनेचा लाभ घ्या पालिका परिसरातील ज्या कुटुंबाकडे स्वत:चे शौचालय नाही.अशा कुटुंबाने शासनाच्या १२ हजार रुपये अनुदानाच्या निधीतून कुटुंबासाठी नवीन शौचालय उभारणीसाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून पालिका क्षेत्र सुंदर व रोगराई मुक्त होईल.
शिल्पा परदेशी, नगराध्यक्षा, वैजापूर.
बातम्या आणखी आहेत...