आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटबंधारे विभागातील कर्मचार्‍यांची सामूहिक दांडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- शहरातील नांदूर-मधमेश्वर सिंचन प्रकल्प कार्यालयात शुक्रवारी कामकाजाच्या वेळेत कार्यकारी अभियंत्यासह एकूण 80 कर्मचारी गैरहजर असल्याचे तालुका प्रशासनाने केलेल्या तपासणीत आढळून आले. तपासणी पथकाने हजेरी मस्टर जप्त केल्याने पाटबंधारे विभागातील कर्मचार्‍यांत खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, लाडगावचे माजी उपसरपंच काशीनाथ रक्ताटे, खंबाळा ग्रामपंचायतीचे सरपंच शुक्रवारी नांदूर-मधमेश्वर कार्यालयात कालव्याचे पाणी का बंद करण्यात आले, याची माहिती घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी कार्यालयात चौकीदार, शिपाई व काही विभागांतील कनिष्ठ लिपिक हजर होते. या प्रकाराची माहिती तहसीलदार महादेव किरवले यांना कळवली.
तहसीलदारांनी अधिकार्‍यांसमवेत पाटबंधारे कार्यालय गाठले. या वेळी कार्यकारी अभियंता आर. एन. वाघमारे, सहायक अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता यांच्यासह विविध संवर्गातील 80 कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. एवढय़ा मोठय़ा संख्येने गैरहजर असल्याचा हा सर्वात मोठा पंचनामा असल्याचे तपासणी पथकाने सांगितले.
हालचाल रजिस्टर गायब- पाटबंधारे विभागाचे अभियंता यांच्या कामकाजाच्या नोंदीसाठी असलेले हालचाल रजिस्टर गायब होते. तसेच हजेरी मस्टरवर 16 ऑगस्टला कर्मचार्‍यांनी स्वाक्षर्‍या केल्या नसल्याचे आढळून आले. दरम्यान, गैरहजर कर्मचार्‍यांचा अहवाल जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठवला जाईल, असे तहसीलदार महादेव किरवले यांनी सांगितले.
दालनाला कुलूप ठोकले- नांदूर-मधमेश्वर पाटबंधारेविभागाच्या मुख्य कार्यालयासह विविध उपविभागांत कार्यकारी अभियंता, उपअभियंता गैरहजर असल्याचे आढळून आल्यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश बोरनारे, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, प्रकाश चव्हाण, बाजार समितीचे संचालक कल्याण जगताप, नगरसेवक वसंत त्रिभुवन, सरपंच सतीश खंडागळे आदी पदाधिकार्‍यांनी कार्यकारी अभियंता आर. एन. वाघमारे यांच्या दालनातील रिकाम्या खुर्चीवर कालव्यात पाणी सोडावे, असे निवेदन देऊन दालनाला कुलूप ठोकले.