आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तालुक्यातील धोंदलगाव येथे चार वर्षांपूर्वी जातीयवादातून २७ वर्षीय दलित तरुणाचा तीक्ष्ण चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात वैजापूरच्या जिल्हा व अपर सत्र न्यायालयाने शनिवारी पाच आरोपींना जन्मठेपीची शिक्षा शनिवारी ठोठावली. रवींद्र रखमाजी आवारे (१९), बाळू विश्वनाथ डमाळे (२६), सचिन दौलत चौधरी (२१), दत्तू ऊर्फ दतात्रय जनार्दन आवारे (२५), गणेश कारभारी साठे (२८, सर्व रा. धोंदलगाव, ता. वैजापूर) अशी न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

धोंदलगाव येथे १५ डिसेंबर २०११ रोजी गावात सायकलवरून कसरती दाखवण्याचा खेळ चालू असताना गावातील भगवान गंगाधर सोळस (२७), बाळू डमाळे व रवींद्र आवारे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. दुसर्‍या दिवशी रात्री १० वाजता भगवान मित्रासह घरी परतत असताना रवींद्रसह इतर आरोपीनी त्यांना अडवले. आदल्या दिवशी घडलेल्या प्रकरणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. बाळूने भगवानला लोखंडी पाइपने मारहाण केली. जखमी झालेल्या भगवानवर रवींद्र व बाळूने चाकूने सात ते आठ सपासप वार केले होते.

१३ साक्षीदार तपासले
या प्रकरणात संदीप अण्णा सोळस याच्या तक्रारीवरून वैजापूर ठाण्यात १७ डिसेंबर रोजी वरील पाच तरुणांविरोधात खून, दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच सार्वजनिक ठिकाणी दंगल घडवणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. विशेष न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत आरोपी तुरुंगात होते. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले. सबळ साक्षीपुराव्याआधारे खून केल्याचे निष्पन्न झाले.