आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

33 लोटाबहाद्दरांना प्रत्येकी 400 रुपयांचा दंड; सायंकाळी सुटका, वैजापूर पालिका आणि पोलिसांची धडक कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - शहरात उघड्यावर प्रातर्विधीला जाणे ३३ जणांना गुरुवारी सकाळी चांगलेच महागात पडले. पालिका प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत लोटाबहाद्दरांना पकडण्यात आले होते. सकाळपासून पोलिस ठाणे ते न्यायालय अशा कारवाईचा फेरा सोसलेल्या ३३ जणांना प्रत्येकी ४०० रुपयांप्रमाणे आर्थिक दंडाची रक्कम त्यांनी न्यायालयात पदरमोड करून अदा केल्यानंतर त्यांची सायंकाळी सहीसलामत सुटका झाली.
 
पालिका प्रशासनाने स्वच्छ सुंदर भारत अभियानात शहर येत्या ३१ मार्चअखेरपर्यंत शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्याचा टप्पा गाठण्यासाठी वर्षभरापासून प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू केली आहे. उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी पालिकेने ज्यांच्याकडे वैयक्तिक स्वच्छतागृह नाही अशा २ हजार मालमत्ताधारकांचे सर्वेक्षण करून त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर आर्थिक अनुदान स्वच्छतागृह बांधकामासाठी दिले. पालिकेने उघड्यावर शौचास जाऊ नये, अशा सूचना, नोटिसा वेळोवेळी देऊनही काही महाभागांनी काही कारवाई होणार नाही या भूमिकेतून पालिकेच्या स्वच्छ, सुंदर शहर अभियानाला खोडा घालण्याचा प्रयत्न केला. 

त्यामुळे पालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल डाके, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या नेतृत्वाखालील गुडमॉर्निंग पथकाने शहरात गुरुवारी पहाटे विविध भागांत उघड्यावर शौचास बसणाऱ्या ३३ जणांना अटक करून त्यांच्यावर मुंबई पोलिस कायदा कलम ११५ ,११७ नुसार कारवाई करण्यात आली. न्यायालयाने त्यांच्याकडून प्रत्येकी ४०० रुपयांप्रमाणे दंड आकारून मुक्तता केली. पालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल डाके, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, उपमुख्य अधिकारी प्रमोद पाटील आदींनी ही कारवाई केली.

नागरिकांनी उघड्यावर जाऊ नये
शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्याच्या अभियानात सुंदर व स्वच्छ राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवावी. पालिकेने स्वच्छतागृह बांधणीसाठी दिलेल्या अनुदानातून बांधणी केलेल्या स्वच्छतागृहाचा वापर करावा, अन्यथा पोलिस व पालिकेच्या पथकाकडून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...