आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला टाळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - पंचायत समितीच्या शिक्षण विभागामधील नियोजनशून्य कारभाराने कळस गाठल्यामुळे सोमवारी सत्ताधारी गटाच्या पंचायत समिती सदस्याच्या पतीने शिक्षण विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. या कारवाईमुळे शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे झाले.

गटशिक्षण कार्यालयात अतिरिक्त ठरलेल्या ‘मुख्याध्यापक व शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत आर्थिक व्यवहार’ व ‘रामनगरात भरली एक दिवसाची शाळा’ अशी दोन वेगवेगळी वृत्ते ‘दिव्य मराठी’त सविस्तर प्रसिद्ध झाल्याने शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला होता. सोमवारी पंचायत समितीच्या महिला सदस्यांचे पती सारंगधर डिके, डॉ. काशीनाथ तेजाड, वाल्मीक बोढरे यांनी शिक्षण विभाग गाठून येथील अधिकारी, कर्मचार्‍यांना बाहेर काढून कार्यालयास कुलूप ठोकले, तर सत्ताधारी पक्षाच्या मंडळींनी रामनगर येथील शाळेला ताबडतोब शिक्षक नेमून बंद पडलेली शाळा सुरू करा व समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी गटशिक्षणाधिकारी एस. एफ. शिरोडे यांच्याकडे केली. या मागण्यांवर निर्णय झाल्यानंतर कुलूप उघडण्यात येईल, अशी भूमिका घेतली.

कुणाचेही नियंत्रण नाही
पंचायत समितीअंतर्गत असलेल्या शिक्षण विभागावर सभापती, उपसभापती यांचा वचक नसल्यामुळे अधिकार्‍यांना वचक बसावा यासाठी सत्ताधारी गटामधील मंडळी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. या प्रकारानंतर तरी पदाधिकारी सरळ होतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.