आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर पंचायत समितीच्या सभापतींनी दिला राजीनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - पंचायत समितीच्या सभापती द्वारका पवार यांनी अखेर तडकाफडकी आपल्या सभापतिपदाचा राजीनामा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांच्याकडे दिला आहे. साधारण वर्षभरापूर्वी पवार यांची या पदावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वर्णी लावण्यात आली होती. दरम्यान, या राजीनाम्यामुळे पंचायत समितीतील सभापतिपदाच्या संगीत खुर्चीचा खेळ पुन्हा एकदा तालुकावासीयांना पाहावयास मिळणार आहे.
वैजापूर येथील पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती स्पष्ट बहुमत आहे.
सुरुवातीची अडीच वर्षे सर्वसाधारण महिलांसाठी सभापतिपद आरक्षित होते. त्यानंतर उर्वरित अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)साठी हे पद आरक्षित झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३ सदस्यांना प्रत्येकी १० महिने सभापतीचा मान मिळणार होता. त्यानुसार १४ सप्टेंबर २०१४ रोजी खंडाळा गणातून निवडून आलेल्या द्वारका पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गेल्या वर्षात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी मते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रथम संधी देण्यात आली होती. पवार यांनी सभापतिपदी वर्णी लागावी यासाठी थेट येवल्यातून जोरदार फील्डिंग लावली होती. त्यांच्याकडून १० महिन्यांनंतर पदभार काढून तो दुसऱ्याकडे देण्याचे अंतर्गत निश्चित झाले होते. दरम्यानच्या काळात विधानसभेवर राष्ट्रवादीने विजय मिळवल्याने कार्यकर्त्यांत उत्साह संचारला होता, तर दुसरीकडे पंचायत समितीची सत्ता सांभाळताना पक्ष नेतृत्वाची मात्र चांगलीच दमछाक होत होती. त्यातच ठरल्याप्रमाणे सभापतिपदाचा पदभार घेतल्यावर वर्ष उलटल्यानंतर पक्षाचे नेते आ. भाऊसाहेब पा. चिकटगावकर व द्वारका पवार यांचे पती लक्ष्मण पवार यांच्यातील "सख्य’ पक्ष कार्यकर्त्यांसह तालुक्यातील नागरिकांना चांगलेच माहीत होते.
सभापतिपदी द्वारका पवार यांची निवड झाल्यापासून आ. चिकटगावकर हे सभापतींच्या दालनात न बसता उपसभापतींच्या दालनातूनच कामकाज पाहत होते. एकीकडे पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याची जबाबदारी, तर दुसरीकडे ठाण मांडून बसलेले पदाधिकारी यांच्या कचाट्यात चिकटगावकर सापडले होते.
काही दिवसांपूर्वी मधल्या फळीतील नेत्यांनी आ. चिकटगावकर यांना सभापती द्वारका पवार यांची मुदत संपल्याची जाणीव करून दिली होती. मात्र, पवार यांच्याकडून राजीनामा घेण्यासाठी तुम्हीच त्यांना सांगा, असा सल्ला आ. चिकटगावकरांनी त्या वेळी दिला होता. त्यामुळे पवार यांना राजीनामा मागावयाचा कोणी, असा जटिल प्रश्न पक्षातील कार्यकर्त्यांसमोर ठाण मांडून होता. दरम्यान, दिवाळीच्या धामधुमीत आ. चिकटगावकर यांनी पंचायत समितीच्या सदस्याची एक बैठक बोलावली होती. त्यातही हाच विषय जोरदारपणे मांडण्यात आला होता. त्यानुसार अखेर सोमवारी द्वारका पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांच्याकडे सुपूर्द केला. या राजीनाम्यावर पंचायत समिती सदस्य अँड. प्रताप निंबाळकर, तर चंद्रकला शेळके यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली आहे.
उपसभापती बदलण्याच्याही हालचाली
सभापतीच्या निवडीनंतर आता उपसभापती बदलण्याच्या हालचालींनीही वेग घेतला आहे. पक्षाने सत्ता ताब्यात घेतल्यावर सर्वांना समान संधी देणार असल्याचे जाहीर केले होते. सभापती द्वारका पवार,उपसभापतिपदी सुभाष जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे उपसभापतीही बदलण्याची मागणी सदस्यांकडून जोर धरत आहे. या मागणीला पक्षनेतृत्व कितपत प्रतिसाद देते हे येणाऱ्या काळात दिसून येईल.