आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त समायोजन प्रक्रिया पोलिस बंदोबस्तात उरकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची आठ दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडलेली अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया मंगळवारी कडक पोलिस बंदोबस्तात पार पडली. असे असले तरी 16 पर्यायी शिक्षकांच्या समायोजनाचा घोळ कायम असल्याचे या वेळी दिसून आले.
मुख्याध्यापकांसह 92 अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत गटशिक्षणाधिकार्‍यांनी घोडेबाजार केल्याचा आरोप विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी करून चार दिवसांपूर्वी समायोजना प्रक्रिया रोखली होती. त्यातच पंचायत समितीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्य पतीने सोमवारी समायोजन प्रक्रियेबाबत आक्रमक भूमिका घेऊन शिक्षण विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकले होते. त्यामुळे मंगळवारी पोलिस बंदोबस्तात पंचायत समितीच्या सभागृहात सभापती बिजला साळुंके, उपसभापती विमल पवार, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, गटशिक्षणाधिकारी एस. एफ. शिरोडे, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत समायोजन प्रक्रिया घाईघाईत उरकण्यात आली.

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत विविध शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. मंगळवारी गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी जिल्हा परिषदेतील निमंत्रित जिल्हा परिषद सदस्य व मनसे शिक्षक सेनेचे नेते श्याम राजपूत यांना प्रवेश नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आम्हाला प्रवेश नसेल तर सभापती, उपसभापती याच्या पतीराजांना प्रक्रियेदरम्यान सभागृहात बसू देऊ नका, अशी भूमिका घेतली. त्यामुळे महिला पदाधिकार्‍यांच्या पतीला प्रक्रियादरम्यान सभागृहाबाहेर बसवले.

पर्यायी शिक्षकांचा घोळ
शिक्षण विभागाने वस्तीशाळेतील 16 शिक्षकांना प्राथमिक शिक्षक म्हणून पदस्थापना दिली आहे. आजच्या समायोजन प्रक्रियेत या 16 शिक्षकांच्या नेमणुकीबाबतचा घोळ कायम राहिला. दरम्यान, गट शिक्षणाधिकारी शिरोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बुधवारी या शिक्षकांच्या नेमणुकीचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

यांचे झाले समायोजन
12 मुख्याध्यापक, 23 पती-पत्नी एकत्रीकरण, 57 सहशिक्षक एकूण शाळा 326

खुलताबादेत 41 शिक्षकांचे समायोजन
खुलताबाद तालुक्यात 41 शिक्षकांचे रिक्त पदावर समायोजन करण्यात आले आहे. त्या शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणी लवकरच पाठवण्यात येणार आहे. यात मुख्याध्यापक 6, सहशिक्षक 37, पदवीधर, विज्ञान, गणित 13 अशा 56 जागा रिक्त होत्या. 56 पैकी 41 शिक्षकांच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात आले आहे. समायोजन करण्यात आलेल्या 41 शिक्षकात 36 सहशिक्षक, 5 मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. या वेळी पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रात सभापती लीलाबाई पवार, उपसभापती दिनेश अंभोरे, सदस्या डी.डी. काळे, कृष्णा कुकलारे, गटविकास अधिकारी बी.डी.दळवी, गटशिक्षणाधिकारी बबन शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी जे. जी. चव्हाण उपस्थित होते. खुलताबाद तालुक्यात 12 मुख्याध्यापक अतिरिक्त होते. त्यातील 11 मुख्याध्यापक मराठी माध्यमाचे आहेत. तालुक्यात 6 मुख्याध्यापकांच्या जागा रिक्त होत्या. त्यापैकी मराठी माध्यमाच्या 4 आणि 2 उर्दू माध्यमाच्या होत्या.