आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Varpudkar In Congress And Bharose In BJP, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॉलिटिकल तमाशा; वरपुडकर काँग्रेसमध्ये तर काँग्रेसचे भरोसे भाजपत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी काँग्रेसमध्ये, तर काँग्रेसचे युवक नेते आनंद भरोसे, शिवसेनेचे संजय साडेगावकर यांनी अनपेक्षितपणे भाजपत प्रवेश करीत विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण केली. या नेतेमंडळींसोबत समर्थक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या पक्षांतराच्या कोलांटउड्याचा आजचा चर्चेचा दिवस ठरला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवशी उमेदवारांची धावपळ अन‌् ‌पक्षांतर, त्यातून पक्षाचा अधिकृत अर्ज यासह कार्यकर्त्यांची जमवाजमव, शक्तिप्रदर्शन घडले. कालपर्यंत ज्यांनी एका पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य केले, त्यांनीच पक्षाचा झेंडा अचानक बदलला. आघाडीच्या बिघाडीने तर युतीतील फुटीने कार्यकर्त्यांना संधी तर मिळाली. त्यातही बंडखोरी करताना थेट दुस-याच पक्षाचा मार्ग चोखाळला. मागील ३० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असणारे व ज्येष्ठ नेते शरद पवारांचे कट्टर समर्थक असलेल्या माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड करताना काँग्रेसचा मार्ग निवडला. जिल्हा परिषदेच्या राजकारणात अयशस्वी ठरल्यानंतर तसेच पक्षातील गटबाजीने राष्ट्रवादीपासून दुरावलेले वरपुडकर हे पाथरी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी लढवतील, असा अंदाज असताना त्यांनी दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधत आपली काँग्रेसची उमेदवारी निश्चित केली. राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याच विरोधात ते राहतील.

अशोक चव्हाण यांचेच कट्टर समर्थक असलेले व परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आनंद भरोसे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. ते परभणी मतदारसंघातून उमेदवारीत आल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय गव्हाणे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

शिवसेनेचे २० वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य असलेले संजय साडेगावकर यांनाही शिवसेनेने जिंतूर मतदारसंघात डावलून नव्याने आलेल्या राम खराबे पाटील यांना उमेदवारी दिल्याने साडेगावकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला.
गंगाखेड शुगर्सचे रत्नाकर गुट्टे यांनीही राष्ट्रवादी सोडून भाजपचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करीत या पक्षाकडून गंगाखेडमध्ये उमेदवारी दाखल केली.