आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोमॅटो, कारले, हिरवी मिरची पाच रुपये किलो !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- काही दिवसांपूर्वी अव्वाच्या सव्वा झालेले भाज्यांचे भाव झपाट्याने खाली आले असून हिरवी मिरची, टाेमॅटाे आणि कारले पाच रुपये प्रतिकिलोप्रमाणे विकू लागले आहेत. आवक वाढल्याचा हा परिणाम असल्याने अन्य भाज्यांनाही मंदी आली आहे. ही माहिती भाजीपाला आडत असोसिएशनचे सचिव श्रीकांत ठोंबरे यांनी दिली.

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये दिवसाला ३० टनांच्या घरात भाज्यांची आवक होत आहे. त्यामुळे भाव पडले आहेत. तीन आठवड्यांपूर्वी हिरवी मिरची ७० ते ८० रुपयांच्या दरात विक्री झाली होती. तिला आता पाच ते सहा रुपयांचा भाव मिळू लागला आहे. कारल्याची अवस्थाही मिरची सारखी झाली आहे. ५० ते ६० रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री कारले चार ते पाच रुपयांचर आले आहेत. टोमॅटोही मंदीच्या गर्तेत अडकले असून, त्याला पाच ते सहा रुपयांचा भाव मिळू लागला आहे.

यंदा पिके जगवण्यापुरता का असेना पाऊस पडल्याने भाज्यांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे लातूरसह शेजारील उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्यांतून होणारी आवक वाढली आहे. पंधरा दिवसांपासून भाज्यांना मंदी आली आहे. आणखी महिनाभर तरी भाज्यांचे दर पडलेलेच असण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

संध्याकाळीही सौदा
बाजार समितीने भाजी मार्केटमध्ये आता सायंकाळीही भाजीपाल्याचा सौदा काढण्याचा निर्णय घेतला असून, त्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी मार्केटमध्ये दोन वेळा सौदा काढण्यात आला. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन समितीने हा निर्णय घेतला आहे. समितीचे उपसभापती मनोज पाटील, विक्रम शिंदे, सचिव मधुकर गुंजकर, भास्कर शिंदे आदींच्या उपस्थितीत संध्याकाळचा सौदा काढण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...