आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:ख उगाळत न बसता काळ्या आईचे कौतुक; वेळ अमावास्या उत्साहात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- निसर्गाने माथी मारलेला दुष्काळ व त्याजोगे आलेले दु:ख उगाळत न बसता आपल्यासह जित्राबाच्या पोटाला अन्नपाणी देणाऱ्या काळ्या आईचे कौतुक मोठ्या उत्साहाने शनिवारी बळीराजाने केले. कारभारणीसमवेत खोपीतल्या लक्षुम्यांचे भक्तिभावाने पूजन करून कुशल मंगलाची अन् धनधान्य संपन्नतेची कामना तिच्याकडे केली. "अोलगे ओलगे सालम पोलगे’च्या घोषाने शिवारे गुंजली. निमित्त होते वेळ अमावास्याचे..

वेळ अमावास्या हा जिल्ह्याच्या कृषी संस्कृतीचा मानाचा सण. पंधरा दिवसांपासून या सणाचे वेध बळीराजाच्या कुटुंबाला लागतात. हे सालही त्यास अपवाद राहिले नाही. बाहेरगावी असलेली मंडळी आदल्या दिवशीच या सणासाठी आपापल्या घरी पोहाेचली होती. शनिवारी सकाळी कुणी पायी, कुणी बैलगाडीने, तर कुणी मिळेल त्या वाहनांनी शेताचा रस्ता धरला होता. शहरात दुकाने उघडी नव्हती. जणू अघोषित संचारबंदी लागल्याचा भास होत होता. गावेही निर्मनुष्य झाली होती, तर शिवारे माणसांनी फुलून गेली होती. बहरलेल्या हरभऱ्यांची, शेंगानी लगडलेल्या तुरीच्या डहाळ्याची, हिरव्यागार गव्हाची की पिवळ्या-केशरी रंगातील करडईच्या फुलांची पार्श्वभूमी या वेळ अमावास्येला लाभली नाही. भज्जीसाठी तुरीच्या शेंगांची अन् अन्य जिनसांची चणचण भासावी, अशी वेळ शेतकऱ्यांवर दुष्काळाने आणली. उजाड राने असली तरी काळ्या आईसाठी बळीराजाने सारे दु:ख बाजूला सारले. भल्या सकाळी त्याने शेत गाठले. कडब्याची खोप बनवून त्यात लक्षुम्यांची प्रतिष्ठापना केली. मनोभावे त्यांचे पूजन करून त्यांना नैवेद्य दाखवला. गावशिवारातील देवी-देवतांचेही पूजन झाले, त्यांनाही नैवेद्य दाखवण्यात आला. मित्रपरिवारासह पंगतीही रंगल्या होत्या.

विलासरावांच्या आठवणी जागल्या
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा हा आवडता सण. ते कुठेही असले तरी या सणासाठी त्यांची बाभळगावी शेतावर सपत्नीक हजेरी ठरलेली असायची. या वेळ अमावास्येलाही त्यांच्या आठवणी जागल्या. बाभळगावी त्यांचे बंधू दिलीपराव व पुत्र धीरज यांनी लक्ष्मीपूजन केले.

पुढील स्लाइडवर वाचा, खोपीतल्या लक्षुम्यांचे मनोभावे पूजन