आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ लेणीची पार्किंग आता पर्यटक अभ्यागत केंद्रात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - वेरूळ लेणीची सुरक्षा आणि प्रदूषणमुक्तीसाठी लेणी परिसरातील वाहनतळ नववर्षाच्या मुहूर्तावर एक जानेवारीला वेरूळ पर्यटक ( अभ्यागत ) केंद्राच्या परिसरात हलवण्यात आले आहे. याबाबतच निर्देश राज्याचे पर्यटन व गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी प्रशासनास दिले होते. त्या अनुषंगाने हे वाहनतळ हलवण्यात आले.

वाहनतळ हलवण्याबरोबरच हॉकर्स, फोटोग्राफर, रिक्षाचालक यांनासुद्धा आता वेरूळ लेणीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. वेरूळ गावासह परिसरातील काही कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने सरपंच साहेबराव पांडव, सदस्य विजय भालेराव, विजय राठोड, अनिल मिसाळ यांच्यासह हॉकर्स, फोटोग्राफर, रिक्षाचालकांनी पुरातत्त्व संवर्धन सहायक हेमंत हुकरे, आर. यू. वाकलेकर यांची भेट घेत लेणीमध्ये व्यवसायास परवानगी देण्याची मागणी केली. नववर्षात वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. पर्यटकांच्या सोई-सुविधांसाठी महामंडळाकडून एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी साध्या चार बसेस आणि दोन सेमी लक्झरी अशा सहा बसेसनी पर्यटकांची वाहतूक केली.

पर्यटकांना साध्या बसचे तिकीट २० रुपये, सेमी लक्झरीचे ३० रुपये, व्हाेल्व्हाे एसी लक्झरीचे ४० रुपये दर आहेत. पर्यटक केंद्र, कैलास लेणी व ३२ नंबरची जैन लेणी या तीन ठिकाणी पर्यटकांसाठी बस बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पर्यटकांनी एकदा तिकीट खरेदी केल्यानंतर अंतर्गत कोणत्याही बसेसमध्ये संपूर्ण ३२ लेणींची पाहणी करता येऊ शकते. पर्यटकांना बसेसची योग्य सुविधा मिळावी, वरिष्ठ आगार व्यवस्थापक सी. के. सोळसे, सहायक वाहतूक निरीक्षक प्रदीप गायकवाड प्रयत्नशील आहेत.

ग्रामपंचायतीला विश्वासात घ्यावे
वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिराबरोबरच गावामध्ये कोणताही निर्णय घेताना संबंधित प्रशासनासह विश्वस्तांनी वेरूळ येथील ग्रामपंचायतीला विश्वासात घेणे गरजेचे आहे व त्यानंतरच निर्णय घ्यावा. - साहेबराव पांडव, सरपंच.

शालेय सहलींचा खर्च वाढणार
वेरूळ लेणी पाहण्याकरिता सध्या शालेय सहली येत आहेत. परंतु, खासगी वाहनांबरोबरच सहलींच्या एसटी बसेसलादेखील लेणीमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आता शालेय सहलींचाही खर्च वाढणार आहे.