आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ लेणीत आता शंभर रुपयांत गाइड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी देश- विदेशातून दररोज हजारो पर्यटक लेणीत भेट देतात. लेणीचा इतिहास जाणून घेण्यासाठी लेणीत पर्यटक मार्गदर्शक गाइडची गरज भासते. परंतु गाइडचे दर अधिक असल्याने बहुतेक पर्यटक फलकावरील सूचना पाहून लेणीचा आनंद घेतात. परंतु आता गाइडचे दर प्रत्येकी १०० रुपये किमान १५ जणांच्या ग्रुपसाठी निश्चित केल्याने आता प्रत्येकाला गाइड घेऊन लेणीची माहिती जाणनू घेणे सोपे होणार आहे.

सध्या अधिकृत पर्यटक मार्गदर्शकांचे शुल्क अधिक असल्याने अनेक पर्यटक गाइडविना लेणी पाहून घेतात. परिणामी त्यांना इतिहासाची पूर्ण माहिती मिळत नाही. याची दाखल घेत येथील बारा पर्यटक मार्गदर्शकांनी एकत्र येऊन पर्यटकांच्या सोईसाठी पंधरा पर्यटकांच्या ग्रुपसाठी यापुढे प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे दर आकारले जाणार आहे.

वेरूळ लेणीतील असलेले बारा पर्यटक मार्गदर्शक हे उच्चशिक्षित तसेच विविध देशांच्या भाषेचे ज्ञान अंगीकृत असल्याने तसेच इंडियन टूर ऑपरेटर असोसिएशन , गाइड असोसिएशन , मिनिस्टरी ऑफ टुरिझम यांनी ठरवून दिल्यानुसार १ ते ५ पर्यटकांसाठी ११९० ते १५०८ रुपये , ६ ते १४ पर्यटकास १५०८ ते १९४४ रुपये तर १५ ते ४० पर्यटकास २००० ते २६१९ रुपये अशा पद्धतीचे दर आकारणी करण्यात येत होती.

सामान्य पर्यटक लेणीच्या इतिहासापासून वंचित राहतात म्हणून भारतीय संरक्षण पुरातत्त्व विभाग व एम.टी. डी. सी च्या सहकार्याने वेरूळ लेणीतील मधुसूदन पाटील , लियाकत अली , विजय कुमार जैस्वाल , रामकृष्ण गारिकिपाठी , आमोद बसवले, विवेक पाठक, एस. टी. प्रधान, पंकज कवडे, अशोक बेडेकर, बलवंत शेवाळे, एकनाथ साळवे , सुभाष शेवाळे या बारा पर्यटक मार्गदर्शकांनी एकत्रित येत पर्यटकांच्या सेवेसाठी हा निर्णय घेतला आहे.

आता पर्यटकांना फक्त शंभर रुपयांत दहा नंबर बौद्ध लेणी, सोळा नंबर कैलास लेणी, बत्तीस नंबर जैन लेणीची जास्तीत जास्त खोलवर माहिती देण्यात येणार असून याचा शुभारंभ सोमवारी वेरूळ लेणीत करण्यात आला. अशा प्रकारचा फलकदेखील लेणी परिसरात लावण्यात आला आहे.

शालेय सहलींना लाभ
पर्यटक मार्गदर्शकांचे दर पाहता शालेय सहली या अनेकवेळा विनापर्यटक मार्गदर्शक लेणीचे पर्यटन करून परत फिरत असत. आता शालेय सहलीसह सामान्य पर्यटक ही आता लेणीचा इतिहास जाणून घ्यायला पुढे येऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...