आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळच्या आश्रमशाळेत निकृष्ट दर्जाचे जेवण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सकाळचा नाष्टा दहा वाजता तर दुपारच्या जेवणात बाजरीची भाकरी व भाजीच्या नावाखाली केवळ पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे त्रासलेल्या एका विद्यार्थ्याने पंधरा दिवसांतच शाळा सोडली. ‘दिव्य मराठी’ने या विद्यार्थ्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला.

ग्रामीण भागात मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खचरून विद्यार्थ्यांना विविध सोयी-सुविधा पुरवण्यात येतात. परंतु वेरूळ येथील राजमाता जिजाऊ आश्रमशाळा या गोष्टींना अपवाद ठरली आहे. देवसिंग निहालसिंग जारवाल रा. जामवाडी, ता. वैजापूर या विद्यार्थ्याने इयत्ता सातवीमध्ये पंधरा दिवसांपूर्वी या आश्रमशाळेत प्रवेश घेतला होता. त्याला सकाळचा नाष्टा 10 वाजता दुपार व संध्याकाळी बाजरीची भाकरी व भाजीच्या नावाखाली फक्त पाणी मिळत असल्याने, या सर्व गोष्टींना वैतागून हा विद्यार्थी आपल्या घरी जाण्यास निघाला होता. विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी थेट ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीशी संपर्क साधून ही धक्कादायक बाब उघडकीस आणली.

‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने गुरुवारी दुपारी जेवणाच्या वेळी आश्रमशाळेस भेट दिली त्रस्त विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांनी मांडलेली कैफियत विदारक असल्याची स्थिती समोर दिसून आली.मात्र, आश्रमशाळा प्रशासनाच्या भीतीपोटी मुलांनी त्या विरुद्ध बोलण्याचे धाडस केले नाही. मात्र आमच्या ताटाचा फोटो काढा, असे विद्यार्थी खुणेने सांगत होते. आश्रमशाळा प्रशासनाला विचारणा केली असता ते म्हणाले, मुलांना भाकरी वरणात चुरून खाता यावी यासाठी अशी भाजी बनवण्यात आली आहे. तर विद्यार्थी अजूनही प्रवेश घेत असल्याचे सांगत, जेवणाविषयी नंतर बोलू असे मुख्याध्यापक डी.एन.पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे बहाने
आम्ही मुलांना घरच्यापेक्षा चांगले जेवण देतो. नवीन विद्यार्थ्यांना इथे करमले नाही की, ते जेवण खराब असल्याचे कारण सांगतात. एन. एस.जाधव, वसतिगृह अधीक्षक

विद्यार्थ्यांची दैना
या ठिकाणी जेवण चांगले मिळत नसून, भाजी म्हणजे केवळ पातळ पाणी दिले जाते. तर सकाळचा नाष्टादेखील 10 वाजता दिला जातो. रात्री आमच्यासोबत आश्रमशाळेचा एकच कर्मचारी असतो, जुने विद्यार्थी नव्या विद्यार्थ्यांना दम भरतात. यामुळे मी ही शाळा सोडून जात आहे. देवसिंग जारवाल, विद्यार्थी

(फोटो - आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना उघड्यावर जेवण दिले जाते)