आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत दूरच; पंचनाम्यासही सायंकाळ उजाडली, ग्रामस्थ हवालदिल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाडसावंगी - दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने हाहाकार उडालेल्या गावांना मदत दूरच, पंचनाम्यासही शनिवारची सायंकाळ उजाडली. यामुळे लाडसावंगी व परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. तब्बल २० तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. पूरस्थिती ओसरली असली तरी पडझड झालेल्या घरांतील सुमारे शंभर जण झेडपी शाळेत आश्रयास आहेत. लोकप्रतिनिधींनीही आश्वासन देण्यापलीकडे काहीही केले नाही.

गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे लाडसावंगी, सय्यदपूर, औरंगपूर, लामकाना, हातमाळी आदींसह परिसरातील अनेक गावांत दुधना नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले होते. यात मका, बाजरीची पिके भुईसपाट झाली. यात नदीकाठची अनेक दुकानेही वाहून गेली. पीडित ग्रामस्थ शनिवारी प्रशासनाच्या मदतीची वाट पाहत होते; परंतु शनिवारी केवळ भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी गावात भेटी देऊन पाहणी करत ग्रामस्थांना आश्वासन दिले. पंचनामा करण्यासाठी महसूल प्रशासनाचे अधिकारी, तलाठी सायंकाळी गावात दाखल झाले. यातही नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांनी जेव्हा त्यांच्याकडे मदत काय मिळणार याची विचारणा केली असता मंडळ अधिकारी डी. एस. तरटे म्हणाले, त्यांच्याकडे नमुना नंबर आठ आहे त्यांनाच मदत मिळेल, अन्यथा मदत मिळणार नाही असे सांगितले. दुकानदारांकडे केवळ ग्रामपंचायत टॅक्स पावती असल्याने त्यांच्या मदतीचे अद्याप भिजत घोंगडेच असल्याने ते हवालदिल झाले होते. पंचनामे मंडळ अधिकारी डी. एस. खाडे, तलाठी संतोष लोलगे, भारती मादनकर, वैशाली कांबळे आदींनी केले.
मदतीसाठी प्रयत्न
दुधना नदीला आलेल्या महापुरामुळे हातमाळी ते ढासलादरम्यान नदीकाठावरील गावे - शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्वांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करू.
रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष
धरण फुटल्याच्या अफवेने खासदारांचा काढता पाय
वेळ दुपारी दोन अडीचची... खासदार रावसाहेब दानवे हे लाडसावंगीमधील व्यापाऱ्यांच्या हानी झालेल्या दुकानांची पाहणी करून हातमाळी गावाकडे जाण्यासाठी गाडीजवळ आले अन् तेवढ्यात पाठीमागून साठ-सत्तर युवकांचा घोळका बाबूवाडी तलाव फुटला. पाणी आले… पाणी… आले पळा…पळा…असे म्हणून ते स्वत:ही गावाच्या दक्षिणेस पळत सुटले. तेवढ्यात खासदार दानवे यांनी बसण्यासाठी आपल्या गाडीत एक पाय ठेवला होता. तेवढ्यात गावातील काही कार्यकर्ते गाडीजवळ आले “दादा तलाव फुटला पूर आला, गाडीत बसू नका येथून लवकर पळा” असे म्हणत त्यांना गाडीतून खाली उतरवले व ते दक्षिणेकडे धावत निघाले. सोबतच्या पोलिस अधिकाऱ्यांचा फौजफाटाही पळत सुटला. सतरा हजार लोकवस्तीचे गाव क्षणार्धात रिकामे झाले.
पाण्याला वाट केल्याने ३ गावांचा जीव भांड्यात
कृष्णा तिडके, जालना - तलाव फुटल्याच्या अफवेने बदनापूर तालुक्यातील भाकरवाडी, ढासला, मालेवाडी या गावांत शनिवारी दुपारी घबराट पसरली. येथील अनेकांनी उंच डोंगरावर, तर काहींनी घराच्या छतावर चढून सुरक्षित ठिकाण गाठले. मात्र, अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी करून पाण्याचा निचरा होण्यासाठी वाट करून दिल्यानंतर तिन्ही गावांतील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने नद्यांना पूर आला, तर तलाव आणि बंधारे ओसंडून वाहत आहेत. बदनापूर तालुक्यातील भाकरवाडी गावाच्या वरील बाजूस असलेला गट्टा फुटल्याच्या भीतीने शनिवारी गावात घबराट पसरली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही वार्ता आल्याने ग्रामस्थांची मोठी धावपळ उडाली. अनेकांनी गावापासून जवळच असलेल्या डोंगरावर, तर काहींनी घराच्या उंच छतावर आसरा घेतला. भाकरवाडीच्या खाली असलेल्या ढासला, मालेवाडी या गावांमध्येही हीच वार्ता पसरल्याने येथेही घबराट पसरली. मालेवाडी येथील जवळपास २०० ग्रामस्थ गाव सोडून सोमठाणा चौफुलीवर गोळा झाले. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला माहिती मिळताच मंडळ अधिकारी जायभाये, तलाठी ए. आर. पाटील यांनी कोणताही अनर्थ होऊ नये म्हणून तलावातील पाणी काढण्यासाठी वाट मोकळी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जेसीबी बोलावण्यात आला. मात्र, रस्ता खराब असल्याने जेसीबी तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. अखेर काही मजुरांच्या मदतीने सांडव्याच्या बाजूने खोदकाम करून पाण्याला वाट मोकळी करून देण्याचे काम सुरू करण्यात आले व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
ग्रामस्थांची धास्ती का वाढली ?
जो तलाव फुटल्याची अफवा पसरली तो भाकरवाडीपासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर आहे. शिवाय उंचावर असून त्याच्यानंतर खाली तीन गट्टे आणि तीन तलाव आहेत. हे सर्व तलाव भरलेले आहेत. हा तलाव फुटल्यास इतर तलाव फुटतील या भीतीने घबराट निर्माण झाली. मात्र महसूल, कृषी, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी केल्यानंतर धाेका नसल्याचे सांगितल्यावर सर्व परिस्थिती नियंत्रणात आली. ग्रामस्थांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण ओसरले.
पाणी काढण्यासाठी प्रयत्न
आम्ही मालेवाडी गावाच्या चौफुलीवर थांबलो असताना तलाव फुटल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने भाकरवाडी येथे पोहोचलो. या गट्ट्याची पाहणी केली. हा गट्टा अनेक वर्षांपासून भरलेला नाही. त्यामुळे भिंतीच्या मध्यभागी पाण्याचे लिकेजेस आहेत. सांडव्याच्या बाजूने पाणी काढून देत आहोत. ग्रामस्थांनी घाबरू नये.
व्ही. व्ही. जायभाये, मंडळ अधिकारी
अफवांवर विश्वास ठेवू नका
तलाव फुटल्याची केवळ अफवा होती. तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांना सांगून ज्या तलावाबाबत शंका होती त्याची पाहणी करून खात्री करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच लोकांमध्ये भीती निर्माण होईल, असे संदेश पसरवू नयेत.
ए.एस.आर.नायक,जिल्हाधिकारी,जालना.