आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या सत्र सुरूच; सरकार मात्र झोपेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - ४८ दिवसांपासून पावसाचा एक थेंबही न पडलेला मराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे. रोज आत्महत्यांचे सत्र सुरू असताना सरकार मात्र झोपले आहे काय, असा जळजळीत सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीत केला आहे.  
 
मराठवाड्यात मागील आठ दिवसांत ३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. १ जानेवारी २०१७  पासून ते १३ ऑगस्ट २०१७ या साडेतीन महिन्यांच्या काळात मराठवाड्यात ५८०  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात ११५  असून त्याला खालोखाल नांदेडमध्ये ९३ औरंगाबाद ७९, उस्मानाबाद ७८, परभणी ७३, लातूर ५६, जालना ५३ तर हिंगोलीतील ३३  शेतकऱ्यांनी आत्महत्येला कवटाळले आहे. मागील आठवडयात आत्महत्या केलेल्या  शेतकऱ्यांची संख्या ५४६  एवढी होती. ४८  दिवसांपासून पावसाचा एक थेंबही न पडलेला मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र वाढत असताना सरकार मात्र केवळ आकड्यांशी खेळ करण्यात गुंग झाले असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.
 
शेतकरी कर्जमाफीची घोषणा होऊनही ती मिळेल की नाही याबाबत  शेतकऱ्यांत विश्वास निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीबरोबरच कर्जमाफीची ऑनलाइन पद्धत  सोपी करण्याची मागणी  मुंडे यांनी केली.

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या वाढल्या : धोंडगे
हिंगोली- गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ, नापिकी हे नैसर्गिक कारणे तर आहेतच; शिवाय सरकारी धोरणामुळे शेतीमालाला मिळालेले कमी भाव आणि अचानक करण्यात आलेली नोटाबंदी  हे सरकारचे चुकीचे धोरण शेतकरी आत्महत्या वाढण्यास कारणीभूत असल्याचा आरोप किसान मंचचे निमंत्रक शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी वसमत येथे केला.  किसान मंचच्या वतीने ९ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान काढण्यात येत असलेला शेतकरी-शेतमजूर सुरक्षा अभियान रथ गुरुवारी वसमत येथे दाखल झाला. वसमत येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झालेल्या या रथयात्रेला शंकरअण्णा धोंडगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तानाजी बेंडे, गोरख पाटील आदी शेतकरी नेते उपस्थित होते. यावेळी धोंडगे यांनी शेतकरी ऊठसूठ किंवा मागायचे म्हणून काही मागत नाहीत, तर शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांवर यापूर्वी कधीही नव्हे एवढे अार्थिक अरिष्ठ आज ओढावल्याने ते कर्जमाफीची मागणी करीत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले अाश्वासन पूर्ण करण्याऐवजी शेतकऱ्यांची टिंगल टवाळी व कुचेष्ठा करण्यातच धन्यता मानत आहेत. आजघडीला शेतकरी जो काही आर्थिक अडचणीत सापडलेला दिसत आहे, त्याचे एकमेव कारण म्हणजे सरकारचे शेतकरी विरोधी आणि भांडवलदार स्नेही धोरण आहे.
बातम्या आणखी आहेत...