परभणी - प्रस्थापितांनी चळवळीतील कार्यकर्त्यांची उपेक्षाच केल्याने समाजाच्या प्रश्नांवर लढा उभारणारे चळवळीतील कार्यकर्ते सातत्याने सत्तेबाहेर राहात आले आहेत. विरोध करणे हाच चळवळीचा पक्ष आहे. जातीचा मनोरा फोडण्यासाठीच विद्रोही चळवळीचा जन्म झाला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी गझलकार तथा विचारवंत डॉ. अजीज नदाफ यांनी शनिवारी (दि.आठ) येथे केले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित 12 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ मराठी गझलकार डॉ. अजीज नदाफ यांच्या हस्ते येथील सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूलच्या प्रांगणावर झाले.
डॉ. नदाफ म्हणाले, विद्रोही चळवळ क्रांती घडवू शकते. कोकणापासून ते नंदुरबारपर्यंत झालेल्या या चळवळीच्या प्रवासात माणसे जोडण्याचे काम झाले आहे. ही चळवळ पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज आहे. अशा विद्रोही संमेलनांतून असे कार्यकर्ते एकत्र यावेत, त्यांच्यातील संघर्षाचा, विद्रोहाचा विचार संघटितपणे पुढे नेण्याचे काम या माध्यमातून व्हावे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून समाजाची व स्त्रियांची टिंगळटवाळी केली जाते. सासवडच्या संमेलनात संमेलनाध्यक्षांकडूनच समाजवादी टवाळखोरी आणि स्त्रियांची अवहेलना करण्यात आली. याचा महाराष्ट्रातून निषेध व्हायला हवा होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.