आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर वैजापूर तालुक्यात आघाडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला तडा गेलेला असताना कॉँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी 12 जागांवर तर कॉँग्रेस 9 जागांवर आघाडीवर राजी झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादीने आघाडीसाठी कॉँग्रेसला 16 जानेवारीची मुदत दिली होती. त्यानुसार दोन्ही पक्षांतील नेतेमंडळींची जागावाटपावर बोलणी झाली असता आघाडीचा निर्णय झाल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद नांगरे यांनी आघाडीचे जागावाटपाचे समीकरण जुळल्याचे सांगितले. 18 जानेवारीला पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या उपस्थितीत येथीळ धुमाळ मंगल कार्यालयात राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असेही नांगरे यांनी सांगितले.
सेनेकडून प्रतिसाद नाही !
निवडणुकीत भाजप-सेना युतीचा धागा जुळेल अशी अपेक्षा होती. तथापि शिवसेनेने भाजपची तालुक्यातील राजकीय ताकद कमी असल्याने युतीला प्रतिसाद दिला नसल्याचे समजते. त्यामुळे नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीत फाटाफूट पडली आहे.
मनसेचेही स्वबळ
21 जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ यांनी दिली. मंगळवार, 17 रोजी सकाळी 11 वाजता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया मनसे पक्ष कार्यालयात घेण्यात येणार आहे.