आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलासरावांच्या पश्चात अख्खे कुटुंब प्रचारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - विलासराव देशमुख म्हणजे काँग्रेसचे स्टार प्रचारक. एकहाती सभा खेचून आणण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत. लातुरात तरी त्यांना प्रचारासाठी फार मेहनत घ्यावी लागायची नाही. मात्र, त्यांच्या पश्चात त्यांचे अख्खे कुटुंब लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेय. त्यांच्या पत्नी वैशालीताई, अमित, धीरज ही मुले आणि बंधू दिलीपराव 15 दिवसांपासून रात्रंदिवस प्रचारात आहेत. त्यात तिसरा मुलगा सिनेअभिनेता रितेशही सामील झाला आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघ सध्या राखीव आहे. काँग्रेसकडून दत्तात्रय बनसोडे उमेदवार आहेत. मात्र, लातूरची जबाबदारी आमदार अमित देशमुख यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. अमित यांनीही गावपातळीपर्यंत यंत्रणा कामाला लावली आहे. त्यांच्या ताब्यात असलेल्या सगळ्या राजकीय संस्थांचे पदाधिकारी, संचालक झाडून कामाला लागले आहेत. मात्र, या निवडणुकीच्या निकालावर अमित देशमुख यांचे राजकीय अस्तित्व अवलंबून असल्यामुळे अख्खे देशमुख कुटुंब प्रचारात उतरले आहे. स्वत: अमित देशमुख यांच्या हातात प्रचाराची यंत्रणा एकवटली आहे. ते सकाळच्या सत्रात पाच-सहा आणि सायंकाळच्या सत्रात पाच-सात गावांत प्रचार सभा घेत आहेत. दोन महिन्यांपूर्वी लातूर लोकसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालेले विलासरावांचे तिसरे पुत्र धीरज यांचा हा जणू प्रशिक्षणार्थी कालावधी आहे. धीरज यांनी जवळपास 150 लहान-मोठ्या सभा घेतल्या आहे.

मतदारसंघातल्या जास्तीत जास्त गावांत पोहोचण्याचा या दोघा भावंडांचा प्रयत्न आहे. विलासरावांच्या निधनानंतर फार तर एक-दोन वेळा सार्वजनिक जीवनात दिसलेल्या त्यांच्या पत्नी वैशालीताई निवडणुकीच्या निमित्ताने लोकांत मिसळल्या आहेत. लातूर शहर आणि तालुक्यात प्रचार करण्यावर त्यांचा भर आहे. महिलांचे मेळावे आणि कॉर्नर बैठका घेऊन त्या काँग्रेस उमेदवारासाठी मत मागत आहेत. विलासरावांनी लातूरसाठी केलेली कामे लक्षात ठेवून त्यांना श्रद्धांजली म्हणून मतदान करण्याचे भावनिक आवाहन वैशालीताई करत आहेत.