आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवंगत माजी मंत्री विलासराव देशमुखांच्या गावात गटबाजीला उधाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या काळापासून एकछत्री अंमल असलेल्या बाभळगाव ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी शुक्रवारी सामुदायिक राजीनामे दिले आहेत. सरपंचाची गुंडगिरी व गावचे सुपुत्र तथा विद्यमान आमदार अमित देशमुख यांचे गावच्या राजकारणाकडे होणारे दुर्लक्ष, ही कारणे पुढे करत हे राजीनामे देण्यात आले आहेत.

राजीनामा देणार्‍या सदस्यांत उपसरपंच शिवाजी मुकुंदराव पाटील, सदस्य गोविंद उत्तमराव देशमुख, उमेश दासराव गायकवाड, ओमप्रकाश भागुराम कुटवाडे, जीवन भगवान तोडकर व ललिता गजेंद्र अवघडे यांचा समावेश आहे. या सदस्यांनी ग्रामसेवकांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. सरपंच श्याम देशमुख हे गावच्या विकासाकडे लक्ष देत नाहीत. ते स्वत: गुत्तेदारी करतात. वेळेवर ग्रामसभा घेत नाहीत, सदस्यांना विश्वासात न घेता काम करतात, विकासकामांबाबत विचारले की धमक्या देतात.

यामुळे सरपंच बदलावा म्हणून आम्ही आमदार अमित देशमुख यांच्याकडे तब्बल आठ वेळा मागणी केली होती; परंतु त्यांनी मागणीकडे दुर्लक्ष केले. म्हणूनच आम्ही हा पवित्रा घेतल्याचे ग्रामपंचायतचे सदस्य ओमप्रकाश कुटवाडे यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. बाभळगाव ग्रामपंचायतीत 15 सदस्य आहेत. विलासराव देशमुख व दिलीपराव देशमुख यांनी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषवले आहे. दरम्यान, या राजीनामा नाट्यानंतर आमदार अमित गावच्या राजकारणात किती लक्ष घालणार व कोणता पवित्रा घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.