आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Villages In Jalna Are Now Working On Recovery From Addiction

आधी तंटामुक्त, नंतर पाणंदमुक्त, आता गावे होताहेत व्यसनमुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - गावातील वाद गावातच मिटवण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ४१९ गावे तंटामुक्त झाली, तर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २१८ गावे पाणंदमुक्त झाली आहेत. त्यामुळे गावागावांत सलोख्याचे वातावरण निर्माण होत अाहे. या सलाेख्यातून गाव व्यसनमुक्त करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नशाबंदी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हिंगकडून गावागावांत जनजागृती केली जात असल्यामुळे आधी तंटामुक्त, नंतर पाणंदमुक्त व आता गावे होताहेत व्यसनमुक्त, असे चित्र पाहावयास मिळत आहे.

गावातील वाद गावातच मिटवण्यात यावेत या अनुषंगाने २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम कार्यरत झाली आहे. पोलिस, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामस्थ यांच्यामुळे जिल्ह्यात तब्बल ४१९ गावे तंटामुक्त झाली आहेत. इतर गावेही तंटामुक्त व्हावीत यासाठी शासनाच्या वतीने प्रोत्साहन म्हणून ग्रामपंचायतीस बक्षीस दिले जाते. आतापर्यंत ९ कोटी ६७ लाखांचा निधी या गावांना वाटप करण्यात आला आहे. त्याचबरोबर २०१४ पासून स्वच्छ भारत मिशन सुरू झाले असून याअंतर्गत जिल्ह्यातील गावे पाणंदमुक्त होण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात स्वच्छता दूत नेमला आहे. सरपंच, ग्रामसेवक, महिला बचत गट, पुरुष बचत गट, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांच्यामार्फत गाव पाणंदमुक्त होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनीही स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत लोकसहभागाच्या तत्त्वावर स्वच्छता अभियानातून गावे पाणंदमुक्त होण्यासाठी या कामासाठी नावीन्यपूर्ण योजना राबवल्यामुळे २०१५ या वर्षात तब्बल २१८ गावे पाणंदमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. याला प्रोत्साहन म्हणून प्रत्येक स्वच्छतागृहातील कुटुंबांना १२ हजार रुपये याप्रमाणे २६ लाख १६ हजार रुपयांचे वाटप टप्प्याटप्प्याने होत आहे.
६० टक्क्यांपेक्षा कमी वैयक्तिक शौचालय असलेल्या जवळपास दोनशे ग्रामपंचायती जिल्ह्यात आहेत. त्यामुळे तालुक्यातील किमान ३० ग्रामपंचायतींची निवड करून शंभर टक्के या ग्रामपंचायती पाणंदमुक्त करणे, पदाधिकारी व सर्व शासकीय कर्मचारी यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करणे, सर्व शाळा व अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे, सांडपाणी कचरा व्यवस्थापन याबाबत जागृती केली जात आहे. गावे पाणंदमुक्त होण्यासाठी नम्रता गोस्वामी, भगवान तायड, संजय डोंगरदिवे, जय राठोड आदी परिश्रम घेत आहेत.

ही गावे झाली तंटामुक्त, व्यसनमुक्त : श्रीधर जवळा, चिखली, वरुडी, रोशनगाव, सोयंजना, साडेगाव, शिंगोना, आनंदवाडी, शेवगा, आंबा, वाई, बामणी, पळसखेडा, तपोवन, सायगाव डोंगरगाव आदी ४२ गावांतील युवकांनी व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे.

राज्यात जालना प्रथम
पाणंदमुक्त गावे होण्यामध्ये जालना जिल्हा प्रथम आला आहे. आगामी काळात जालना हा भारतात प्रथम आणण्याचा मानस आहे. चालू वर्षात ५० हजार स्वच्छतागृहे बांधणार आहोत.
बबनराव लोणीकर, मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता
व्यसनमुक्तीवर भर

गाव तंटामुक्त होऊन बक्षिसास पात्र ठरले आहे. आता गाव व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सहा महिन्यांपूर्वीच गावात व्यसन करणाऱ्यांना समज दिली आहे.
सिंधुबाई भुतेकर, सरपंच, हिवर्डी.
सकारात्मक बदल

पूर्वीपेक्षा अनेक तंटे आता गावात मिटवले जात असल्यामुळे सकारात्मक बदल होत आहे. यासाठी युवकांचा जास्त पुढाकार आहे. पोलिसांकडूनही मदत केली जात आहे.
राहुल माकणीकर, प्रभारी पोलिस अधीक्षक
युवकांचाच पुढाका

गावात कुणीही व्यसन करत असल्यास पहिल्यांदा त्यांना समज दिली जाते. त्यामुळे गावात तरी कोणी व्यसन करत नाही. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिरामुळे हा बदल झाला आहे.
गणेश शिराळे, ग्रामस्थ, अांबा, (ता. परतूर)
जिल्ह्यात जनजागृती

युवक व्यसनमुक्त राहण्यासाठी श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेतले जात आहे. शिवाय या गावात व्यसनमुक्त तरुणांमध्ये जनजागृती केली जात आहे
प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ, समन्वयक