आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांनी माझ्याकडे क्लास लावावा, त्यांना मी चांगले शिकवेन; विनोद तावडे यांची बोचरी टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूर- सरकार कसे चालवावे लागते याचा अजित पवारांनी माझ्याकडे क्लास लावावा. राज्याचा शिक्षणमंत्री असल्याने त्यांना मी चांगले शिकवू शकतो, अशी बोचरी टीका विनोद तावडे यांनी अजित पवार यांच्यावर केली. गुजरात राज्याच्या धर्तीवर मराठवाड्यातील एकमेव अशा १७६ गावांच्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ व २२० केव्ही विद्युत केंद्राचा लोकार्पण सोहळा मंगळवारी परतूरमध्ये झाला. त्या वेळी ते बोलत होते.
 
तावडे म्हणाले, आजचे विरोधक सत्तेत असताना केवळ घोषणा करायचे. त्याची अंमलबजावणी करण्याची तसदी त्यांनी कधीच घेतली नाही. त्यामुळे प्रकल्पांच्या किमती भरमसाट वाढल्या. मात्र येत्या तीन वर्षांच्या काळात भाजप सरकार राज्यातील सर्व अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लोकहिताचे निर्णय घेणारे भाजप सरकार खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे सांगत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, या ५० दिवसांत सर्वसामान्य जनतेने देशासाठी कळ सोसली आहे.

केवळ काळा पैसा असणाऱ्यांच्याच पोटात कळ होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तावडे म्हणाले की, निवडणुकीतील जाहीरनाम्याप्रमाणे भाजप सरकार मराठा आरक्षणाबाबत आग्रही असून त्यासाठी सरकारच्या वतीने ११७२ पुरावे गोळा करून न्यायालयास सादर करण्यात आले आहेत. दरम्यान, परतूर-मंठ्याला ज्याप्रमाणे एकाच तोटीतून पाणी दिले त्याचप्रमाणे संपूर्ण जालना जिल्ह्यालाही द्या, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. तर जालना तालुक्यातील ७० गावांसाठी अशीच ग्रीड पाणीपुरवठा योजना राबवण्याचा मनोदय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला. या वेळी मंचावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 
दुष्काळी तालुक्यांना पॅकेज : कायम दुष्काळी असणाऱ्या मराठवाड्यातील काही तालुक्यांसाठी ११ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी आम्ही केंद्राकडे केली असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी  दिली. राज्यातील २६ मोठे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांची गरज आहे. हा  प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे पाठवला होता तो मंजूर झाला आहे. तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पासाठी त्यातून आम्ही ४५३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मार्च २०१७ पर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा  सरकारचा प्रयत्न राहणार आहे. शहरालगत उभारण्यात आलेल्या २२० केव्ही केंद्राचे उद््घाटन महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

मराठवाड्यासाठी योजना 
माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी १७६ गावांची तहान भागवण्यासाठी ग्रीड पाणीपुरवठा योजना मराठवाड्यात पहिल्यांदा परतूर–मंठा मतदारसंघात होत आहे. या योजेनेच्या धर्तीवर संपूर्ण मराठवाड्यासाठी १५ हजार कोटी रुपयांच्या मराठवाडा पाणी ग्रीड योजनेच्या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी मिळाली असल्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...