आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 महाविद्यालयांत व्हर्च्युअल क्लास !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - ‘आय वेलकम ऑल स्टुडंट्स इन व्हर्च्युअल क्लासरूम’ हे वाक्य सभागृहातील स्क्रीनवर ऐकून राज्यभरातील सुमारे 30 महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी टाळ्या वाजवून नव्या उपक्रमाचा स्वीकार केला. या वेळी त्यांना प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाल्याची जाणीव झाली. याच पद्धतीने राज्यातील 250 महाविद्यालयांना आता देश-विदेशातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. मायक्रोबायोलॉजी सोसायटीने या उपक्रमाचे यशस्वी प्रात्यक्षिक केले.

मायक्रोबायोलॉजी सोसायटीने ‘विझ् आय क्यू’ अर्थात व्हर्च्युअल क्लासरूमच्या उपक्रमाचे प्रात्यक्षिक केले. या क्लासरूमच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 250 महाविद्यालयांतील विद्यार्थी नियोजित वेळेनुसार सूक्ष्मजीवशास्त्राचे धडे घेऊ शकतील. त्यांना राज्यासह देश-विदेशातील तज्ज्ञांचेही मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थी किंवा महाविद्यालयाला सोसायटीकडे नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्याला या वेबसाइटवर व्याख्यानाची तारीख, वेळ, व्याख्यात्याचे नाव, पद याबाबतची सर्व माहिती मिळणार आहे. नियोजित वेळेनुसार संबंधित व्याख्याते मार्गदर्शन सुरू करतील.

यादरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न उपस्थित करता येतील. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर व्याख्याते तत्काळ उत्तर देतील. मायक्रोबायोलॉजी सोसायटीने येत्या वर्षाचे नियोजन सुरू केले आहे. उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक ादरम्यान सोसायटीचे अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए. एम. देशमुख यांना राज्यातील अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी ऑ नलाइन प्रश्न विचारले आणि त्यांच्याशी संवाद साधला.

‘वन मंथ, वन लेक्चर’ उपक्रम
मालदीवमधील भारताचे माजी राजदूत ज्ञानेश्वर मुळे काही दिवसांपासून कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देत आहेत. ‘वन मंथ, वन लेक्चर’असे त्यांच्या उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमातूनच डॉ. ए. एम. देशमुख यांनी व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी या उपक्रमात 30 महाविद्यालये सहभागी झाली. फुलांचा बुके दाखवून नव्या वर्षात तंत्रज्ञानातील नव्या उपक्रमात आपले स्वागत असल्याचे जाहीर करण्यात आले. सुरुवातीला केवळ थेट महाविद्यालयाला, त्यानंतर जैवतंत्रज्ञानासंबंधी देशभरातील विद्यार्थ्यांनाही उपक्रमात सहभागी होता येईल.

शिक्षणातील क्रांतिकारी सुरुवात
एकाच वेळी घरबसल्या शिक्षण देणारी ही प्रणाली एखाद्या सोसायटीने प्रथमच वापरात आणली आहे. यापूर्वी कंपन्यांमध्ये किंवा एका विद्यालयापासून दुस-याविद्यालयापर्यंत या प्रणालीचा वापर होता. एकाच वेळी 250 महाविद्यालयांना जोडून लेक्चर देण्याची ही क्रांतिकारी सुरुवात आहे. या प्रणालीला हजारो विद्यार्थी जोडता येतात. या पद्धतीने राज्यातील 250 महाविद्यालयांना आता देश-विदेशातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
सतीश झेंडे, सेवा वितरक, व्हर्च्युअल क्लासरूम (विझ् आय क्यू), औरंगाबाद.