आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेची पुडी देऊन मतदारांचे स्वागत; मराठवाड्यात 460 गटांमध्ये 2712 उमेदवार रिंगणात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - राज्य निवडणूक आयोगाच्या धर्तीवर जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक मतदारसंघ आदर्श करण्यावर भर दिल्याची माहिती निवडणूक विभागाचे प्रमुख उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिली.
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग केला होता. त्या धर्तीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक तालुक्यात एक मतदान केंद्र आदर्श करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे स्वागत साखरेची पुडी देऊन केले जाईल. बसण्यासाठी सोफा सेट, पंखा, वीज, पाणी, अपंगांसाठीची सोय अशा अनपेक्षित सुविधा पुरवल्या जातील, असे ते म्हणाले.  

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या असून सर्व मतदारांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उमेदवाराने खर्चाचा बिनचूक हिशेब सादर करावा, अन्यथा अनर्हतेची कार्यवाही केली जाईल.  
 
प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणूक संपल्यानंतर ६० दिवसांच्या आत खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराने सादर केलेल्या शपथपत्राचा गोषवारा मतदान केंद्रासमोर प्रकाशित करण्यात येईल. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी गृहनिर्माण संस्था विद्यापीठे, महाविद्यालये, बँका, स्वयंसेवी संस्था, उद्योग समूह इत्यादींची मदत व सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मतदारांना प्रलोभने देण्यासाठी वाटण्यात येणाऱ्या रकमा, दारू व इतर वस्तूच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना  केल्या आहेत.  आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे. 

बीड : ४६ अतिसंवेदनशील केंद्रांवर पोलिसांची नजर
६० गट व १२० गणांसाठी १८६५ केंद्रांवर मतदान होणार असून जिल्ह्यात १५ लाख १ हजार ५५१ मतदार हक्क बजावणार आहेत. ३७३० ईव्हीएम मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मतदानाच्या प्रक्रियेसाठी चार हजारांपेक्षा अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साठ गटांसाठी एकूण  ७४९ उमेेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या १२० जागांसाठी १४०३ उमेदवार मैदानात उतरले आहेत.  
 
जिल्ह्यात  जिल्हा परिषदेसाठी एकूण  १८६५ मतदान केंद्रे आहेत. ४६ केंद्रे अतिसंवेदनशील असून १५२ केंद्रे संवेदनशील आहेत. जिल्ह्यात ६ लाख ९७ हजार ३५ स्त्री व ८ लाख ४ हजार ५१५ पुरुष असे मिळून १५ लाख १ हजार ५५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर ३७३० ईव्हीएम मशीन उपलब्ध करण्यात आल्या असून १९७ झोनल अधिकारी, १८६५ केंद्राध्यक्ष, तर ७८२० कर्मचारी नियुक्त केले आहेत. 

चार हजारांवर पोलिस बंदोबस्त : २ अपर पोलिस अधीक्षक, १ सहा. पो. अधीक्षक, ७ पो. उपअधीक्षक, १४५ पो. अधिकारी, १५०९ पो. कर्मचारी,  १८५ दंगल नियंत्रक पथकाचे कर्मचारी तैनात आहे. परजिल्ह्यातून ५ पोलिस उपअधीक्षक, ७० पोलिस अधिकारी, ०१ सीआरपीएफ कंपनी, ९०० पोलिस कर्मचारी, ९१४ होमगार्ड बंदोबस्तासाठी मागवण्यात आले आहेत.  
 
बीड
एकूण    जागा    उमेदवार
गट    ६०    ७४९
गण    १२०    १४०३
 
हिंगोली : ६७१ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात होणार बंद
५२ गट तर १०४ गणांसाठी ९०२ केंद्रांवर मतदान होणार असून अनुक्रमे २४५, ४२६ अशा एकूण ६७१ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात  बंद होणार आहे. दोन्ही काँग्रेसने युती केली आहे. असे असले तरी ३ ठिकाणी हे पक्ष मैत्रीपूर्ण लढत देत आहेत.  शिवसेना, भाजप, बसपा, संभाजी ब्रिगेड, भारिप-बहुजन महासंघ आदी पक्षही मैदानात असून त्यांनी स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. त्यामुळे उमेदवारांची संख्या वाढली आहे. गटासाठी २४५ तर गणासाठी ४२६ उमेदवार आहेत. जिल्ह्यातील ९०२ मतदान केंद्रांवर ७ लाख १५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
 
हिंगोली
एकूण    जागा    उमेदवार
गट    ५२    २४५
गण    १०४    ४२६
 
नऊ लाख मतदार: परभणी
गुरुवारी (दि.१६)  नऊ तालुक्यातील ९ लाख एक हजार ५९  मतदार ११४२ केंद्रांवरून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी निवडणूक विभागाने पाच हजार १५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषदेच्या ५४ व पंचायत समितीच्या १०a८ गट-गणांत गुरुवारी मतदान होणार आहे. त्यासाठी महसूल प्रशासनाने जय्यत तयारी केली असून बुधवारी कर्मचारी मतदान यंत्रांसह केंद्रांमध्ये रवाना झाले आहेत.  मतदारांत चार लाख ७२ हजार आठ पुरुष, तर चार लाख २९ हजार ४७ महिला मतदारांचा समावेश आहे.  
 
परभणी
एकूण    जागा    उमेदवार
गट    ५४    २८०
गण    १०८    ५०५
 
२०९३ केंद्रांवर मतदान: नांदेड
जिल्ह्यात ९४४० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  ६३ गटांसाठी आणि १२६ गणांसाठी होणाऱ्या मतदानासाठी २०९३ मतदान केंद्रे सुनिश्चित करण्यात आली आहेत. यापैकी ५७ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याने निवडणूक यंत्रणा व पोलिस यंत्रणेने त्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात मतदानासाठी पात्र मतदारांची संख्या १६ लाख ९४ हजार ७०५ इतकी आहे. त्यामध्ये ८ लाख ९० हजार ३३२ मतदार पुरुष आणि ८ लाख ४ हजार ३३६ मतदार स्त्रिया आहेत. 
 
नांदेड
एकूण    जागा    उमेदवार
गट    ६३    ३७४
गण    १२६    ६०३
 
दोन हजार ३०० पोलिस: जालना
जिल्ह्यात ५६ गट व ११२ गण असून १ हजार ३१४ केंद्रांवर मतदान प्रक्रिया होत आहे.  गटाच्या २७०, तर गणाच्या ४९८ उमेदवारांसाठी जिल्ह्यातील ११ लाख ७ हजार ८१३ मतदार मतदान करणार आहेत. सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १७ व्हिडिओ सर्व्हे लाइन पथकाद्वारे चित्रीकरण, तर २ हजार ३०० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. उमेदवारांकडून काही उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून पंधरा दिवसांपासूनच नियोजन सुरू आहे. 
 
जालना
एकूण    जागा    उमेदवार
गट    ५६    २७०
गण    ११२    ४९८

प्रथमच महिला कर्मचारी: उस्मानाबाद
जिल्हा निवडणूक विभागाने प्रथमच महिला कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करण्यासाठी नियुक्ती केली आहे. उस्मानाबाद व उमरगा तालुक्यात ४५० महिला प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी म्हणून काम करणार आहेत. असा प्रयोग प्रथमच होत असून त्यांचा बुधवारचा (दि. १५) मुक्काम मतदान केंद्रावरच असणार आहे. अन्य ठिकाणी नेहमीप्रमाणे बुरखाधारी महिला मतदारांना ओळखण्यासाठी महिलांची नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने जोरदार तयारी केली आहे. 
 
उस्मानाबाद
एकूण    जागा    उमेदवार
गट    ५५    २५४
गण    ११०    ३६०
 
{ मराठवाड्यातील ४६० गटांमध्ये २७१२, तर ९२० गणांसाठी ४८९२ उमेदवार रिंगणात.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...